22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरकाचबिंदूचे निदान वेळेवर होणे गरजेचे: डॉ. शहा

काचबिंदूचे निदान वेळेवर होणे गरजेचे: डॉ. शहा

लातूर : प्रतिनिधी
जागतिक काचबिंदू आठवडा दि. १० ते १६ मार्च या कालावधीत पाळला जात आहे. अंध्यत्व येण्याच्या कारणांपैकी मोतीबिंदूच्या खालोखाल काचबिंदू हे कारण आहे. यामध्ये रुग्णाची नजर हळूहळू कमी होत असल्याने त्याची लवकर जाणिव होत नाही त्यामुळे रुग्ण डॉक्टरांकडे उशिरा जातो तेव्हा रुग्णाची नजर कायमस्वरुपी गेलेली असते. म्हणून काचबिंदूला डोळ्याचा सायलेंट किलर म्हटले जाते. हे टाळण्यासाठी काचबिंदूचे निदान वेळेवर होणे गरजेचे आहे, असे येथील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्र. के. शहा यांनी सांगितले.
मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर गेलेली नजर संपूर्ण येते तर काचबिंदूच्या शस्त्रक्र्रियेनंतर असलेली नजर टिकविण्याचा प्रयत्न असतो. काचबिंदू हा वाढत जाणारा आजार आहे. हा वयाच्या चाळीशीनंतर होणारा आजार आहे.  या आजारावर वारंवार चष्म्याचा नंबर बदलणे, अंधारात गेल्यानंतर उशिराने डोळे सरावणे, सभोवतालचे कमी दिसणे ही लक्षणे आहेत. डोळ्याचे काचबिंदूने किती नुकसान झाले हे सर्वप्रथम ऑप्टीकल टोमोग्राफीने व नंतर पेरीमेट्री तपासणीने कळू शकते. ओ. सी. टी. तपासणीचा फायदा टारगेट  प्रेशर निश्चित करण्यासाठी  होतो.
बरेच रुग्ण डॉक्टरांकडे वेळ जातो म्हणून चष्म्याच्या दुकानात जाऊन नंबर काढून चष्मा घेतात. त्यांना वाढलेले प्रेशर लक्षात येत नाही. डोळ्याच्या प्रेशर बरोबर कॉर्निया (बुबूळ) जाडी मोजणे गरजेचे असते. ज्यांच्या कॉर्नियाची जाडी कमी त्यांना नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे वयाच्या ४० वर्षानंतर प्रत्येकाने दर वर्षी एकदा तरी डोळे तपासून घ्यावेत व काचबिंदूच्या आजारापासून येणारे अंध्यत्व टाळावे, असे आवाहनही  डॉ. प्र. के.  शहा यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR