परभणी : पूर्णा परिसरातील कानेगाव आणि जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे वाळुची चोरटी वाहतुक करणा-यांवर मंगळवार, दि.६ रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ११ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पूर्णा तालुक्यातील कानेगाव परिसरातील पूर्णा नदीपात्रात केलेल्या कारवाईत एक ट्रॅक्टर, रेती काढण्यासाठी वापरण्यात येणा-या केन्या व तीन ब्रास वाळु असा ४ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पूर्णा पोलिसात नारायण प्रकाश पारटकर, माऊली होळकर या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिंतूर तालुक्यातील येलदरी बसस्थानक परिसरात केलेल्या कारवाईत एक टिप्पर, दोन ब्रास वाळु असा ११ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात आरोपी रामेश्वर कुंडलीक घुगे व टिप्पर मालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा पो.नि. विवेकानंद पाटील, पोलिस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, अजीत बिरादार, पोलिस अंमलदार रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, हनुमान ढगे, सिध्देश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पौळ यांच्या पथकाने केली.