जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील उमरगा रेतू पाटी जवळ शिरूर ताजबंद ते निजामाबाद राज्य महामार्गावर शेताकडून येणा-या शेतकरी व त्यांच्या मुलास भरधाव कारने उडवले. यामध्ये दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि १५ मार्च रोजी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास घडली आहे.
जळकोट तालुक्यातील उमरगा रेतू येथील अंकुश विश्वनाथ गिते ( वय-५० ) व ओमकार अंकूश गिते (२४) हे दोघेजण आपल्या शेताकडून दुचाकीवर गावाकडे जात होते. दि १५ मार्च रोजी संध्याकाळी ७.३० वाजता एम एच २४ बीएक्स २२९४ या क्रमांकाच्या कारने या थांबलेल्या थांबलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दोघेही पिता-पुत्राचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. भरधाव कारने दुचाकीला उडविल्यानंतर मोठा आवाज झाला. तो अर्धा किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. यानंतर घटनास्थळी गावकरी धावले व सदरील कारच्या चालकास पकडून ठेवले. कारही धडक दिल्यानंतर खड्ड्यात जाऊन पडली. यामध्ये कारच्या एअरबॅग उघड्या झाल्या होत्या.
अपघात झाल्यानंतर शिरूर ताजबंद ते निजामाबाद या राज्य महामार्गावरील काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. गावातील ५० ते १०० नागरिक घटनास्थळी धावून आले व तात्काळ जखमींना हाडोळती येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. तिथून पुढे अहमदपूर येथे नेण्यात आले. परंत दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.अंकुश गिते हे गावातील एक आदर्श शेतकरी होते. या सोबतच ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच होते तर त्यांचा मुलगा ओमकार गिते हा अत्यंत शांत स्वभावाचा होता. दोघा पिता-पूत्राच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
शेताजवळच उडवले
स्वत:च्या शेतात जवळून अंकुश गिते व त्यांचा मुलगा ओमकार गीते तसेच अंकुश गीते यांची पत्नी तिघेही जण शेतात काम करून घराकडे दुचाकीवर निघाले होते . शेतातून दुचाकी काढून रस्त्यावर आणून उभी केली होती. दोघेजण दुचाकीवर बसले होते तर पत्नीही बसण्याचा प्रयत्न करत होती परंतु चेरा पाटीकडून येणा-या कारने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले व दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अगदी शेताजवळच घडली
