श्रीनगर : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पूर्ण काश्मीरात पोलीस आणि लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत ७५ ओव्हर ग्राऊंड वर्कर्सना अटक करण्यात आली असून चौकशीसाठी ३ हजाराहून अधिक लोकांना एनआयए आणि पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांची कसून चौकशी होत आहे. अटक केलेल्यांमध्ये बहुतांश दक्षिण काश्मीरातील लोक आहेत.
सूत्रांच्या हवाल्यानुसार, २० हून अधिक ओव्हर ग्राऊंड वर्कर्सला पकडले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणा भलवाल जेलमध्ये बंद २ जणांची चौकशी करण्याची तयारी करत आहे. लश्करचे २ ओव्हर ग्राऊंड वर्कर्स निसार अहमद हाजी आणि मुस्ताक हुसैन यांना प्रश्न विचारले जाणार आहेत. हे दोघेही लश्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना मदत करायचे. २०२३ साली भाटा धुरिया आणि तोतागली येथे सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावेळी या दोघांनी दहशतवाद्यांची मदत केल्याच्या आरोपात ते अटकेत आहेत.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी नैसर्गिक गुफा किंवा इथल्या जंगलात मागील १० दिवसांपासून लपले आहेत. सुरक्षा यंत्रणा या संपूर्ण परिसराचा कसून तपास करत आहे. सुरक्षा दल बैसरन खोरे, त्यानंतर तारनू हपतगुंड, डावरू आणि त्या आसपासच्या घनदाट जंगलात शोध मोहीम करत आहेत. पहलगाम, बैसरन खोरे आणि त्याच्या आसपासच्या २० किमी परिसरातील २० एप्रिलपासून विविध मोबाईल फोन लोकेशन, कॉल डिटेल्स गोळा करण्याचे काम तपास यंत्रणा करत आहे.