नागपूर : प्रतिनिधी
ब्रेन ट्यूमर देशातील दुर्धर आजाराचे दहावे प्रमुख कारण आहे. किरणोत्सर्गाचा सहवास आणि कौटुंबिक इतिहास असलेल्यांमध्ये ही जोखीम वाढते. सरासरी लोकसंख्येच्या १ टक्के लोकांना आयुष्यात ब्रेन ट्यूमरच्या संकटाचा सामना करावा लागतो. मात्र, अलीकडे ही जोखीम वाढत आहे, अशी माहिती मेंदुरोग शल्यचिकित्सक डॉ. राहुल झामड यांनी दिली.
जागतिक ब्रेन ट्यूमर दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात डॉ. झामड म्हणाले, ब्रेन ट्यूमरमुळे होणा-या मृत्यूंची संख्या दरवर्षी वाढत आहे; मात्र या आजाराबाबत समाजात जागरूकता नाही.
आयोनायझ्ािंग रेडिएशनच्या संपर्कात येणे आणि मेंदूच्या कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास असणे, ही ब्रेन ट्यूमर विकसित होण्यासाठी मोठी धोक्याची घंटा असते. वेळेवर हस्तक्षेप आणि चांगले उपचार केले तर सरासरी जीवनमान वाढवून या रुग्णांचे पुनर्वसन करणे सहज शक्य आहे.
ब्रेन ट्यूमर असलेल्यांचे लवकर निदान व्हावे यासाठी ट्यूमर क्लिनिक उपराजधानीत चालविले जाते. या क्लिनिकमधून गेल्या २ महिन्यांत ३२ वर्षीय महिलेच्या मेंदूतील ६ बाय ७ सेमी आकाराचा ट्यूमर क्रॅनियोटॉमीने दूर केला.
जबलपूरमधील ६५ वर्षीय ज्येष्ठासह ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीचे अचूक निदान करून त्यांची भविष्यातील अपंगत्वातून सुटका करण्यात आली. याखेरीज ५८ वर्षीय पुरुषाच्या मेंदूतील ट्रान्स नासल ट्रान्सफेनोइडल एन्डोस्कोपिद्वारे सेलर मास पूर्णपणे काढून त्याची भविष्यातील अंधत्वातून सुटका करण्यात आली, असे डॉ. झामड यांनी सांगितले.
ब्रेन ट्यूमरचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये त्याचे प्रमाणचिंंताजनक आहे. मोबाईलचा अतिवापर मेंदूसाठी धोकादायक आहे. ब्रेन ट्यूमर विकसित होण्याचे वय नाही. ३ ते १५ वयोगटात किंवा वयाच्या पन्नाशीपूर्वी आणि पन्नाशीनंतरही विकसित होतो.