किल्लारी : वार्ताहर
किल्लारी येथील महिला सरपंच सौ सुलक्ष्णा बाबळसुरे यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र करून घोषीत करुन सरपंच पद रिक्त झाल्याचा निर्णय दि ३१ जुलै २०२६ रोजी दिला आहे. सरंपचाच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्य गुंडाप्पा चंद्रकांत बालकुंदे यानी दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवार यांच्याकडे सरपंच व ग्रामविकास अधिकारी याच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ७ (१) ३६ प्रमाणे अर्ज करून सरपंचांनी कायद्यानुसार आवश्यक ग्रामसभा मासिक सभा नियमित घेतल्या नाहीत म्हणून अपात्र घोषित करण्याची मागणी केली होती तसेच सरपंचांनी दि. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी पद्भार स्वीकारल्यापासून फक्त २६ जानेवारी २३ रोजी ग्रामसभा घेतली.
कायद्यानुसार वर्षातून चार ग्रामसभा घेणे आवश्यक आहेत तसेच मासिक सभांना सर्व सदस्यांना अधिकृत नोटीस देणे बंधनकारक असताना स्वत:च्या पॅनलच्या सदस्यांनाच देणे इतर दुस-या सदस्यांना त्यांनी विश्वासात घेतले नाही अशी तक्रार केली होती. यावेळी जिल्हाधीकारी यांनी दोन्ही कडील बाजू त्यांच्या वकीलामार्फत ऐकून घेतल्या व सरपंच सुलक्ष्णा बाबळसूरे अर्जदार यांनी सादर केलेले पुरावे तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती औसा यांचा चौकशी अहवाल विचारात घेऊन अर्जदार गुंडाप्पा बालकुंदे यांचा अर्ज मंजूर करण्यात आला. यावेळी सरपंच यांना अपात्र ठरवून सरपंच पद्धत रिक्त झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवार यानी दि ३१ जुलै २६ रोजी घोषीत केले. अर्जदार गुंडाप्पा बालकुंदे यांच्यातर्फे अॅड. डि. के. भालके तर सरपंच सुलक्ष्णा बाबळसूरे यांच्यातर्फे अॅड. बि.जी कदम यांनी काम पाहिले.
















