आपचा दिल्लीत मोर्चा, केंद्र सरकारवर हल्लाबोल
दिल्ली : वृत्तसंस्था
ई-२० इंधनाच्या विरोधाची धग आता संपूर्ण देशभरात पसरली असताना याच मुद्यावरून आपचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मैदानात उतरले आहेत. ई-२० इंधनाच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. असे असताना हा मोर्चा निघाला होता. परिणामी फिरोजशाह रोडवर पोलिसांनी हा मोर्चा अडवला. यावेळी केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे झुकल्याचा आरोप केला. ट्रम्पच्या दबावाखाली ई-२० चा निर्णय थोपवला जात असल्याचे म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली इथेनॉल-मिश्रित इंधनाला प्रोत्साहन देत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला की, पंतप्रधान ट्रम्प यांच्यापुढे झुकत आहेत आणि या धोरणाचा फायदा भारतीय शेतक-यांऐवजी अमेरिकन शेतक-यांना होईल. त्यांनी सांगितले की, २.३३ लाख लोकांनी इथेनॉल धोरणाला विरोध केला.
देशभरात इथेनॉल लागू करणे हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी किंवा हरदीपसिंग पुरी यांच्या स्तरावरील निर्णय नाही तर तो पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. त्यांनी आरोप केला की, हा निर्णय केवळ ट्रम्प यांच्या दबावाखाली घेतला जात आहे आणि सरकारने बा दबावाला बळी न पडता लोकांना शुद्ध पेट्रोल द्यावे, असे आवाहन केले.
ट्रम्प यांच्या दबावाला
सरकारने बळी पडू नये
आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले, मला हे सांगायचे आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दबावाला बळी पडू नये. त्यांनी अमेरिकेकडून इथेनॉल खरेदी करणे आणि आपल्या देशावर ई-२० लादणे थांबवावे, असेही केजरीवाल यांनी सांगितले.
















