जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये यंदा तुफान पाऊस झाला या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतक-यांना सोयाबीन तसेच मूग व उडीद त्यांच्या उत्पन्नामध्ये ५० टक्के घट झाली आहे. यासोबतच कापूसही एका वेचणीमध्येच संपला. यामुळे शेतक-यांना अशा होती ती तूर या पिकावर परंतु तूरही आता शेतक-यांच्या हातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या हवामानातील बदलामुळे तुरीवर मोठ्या प्रमाणात रोगराईचा प्रादुर्भाव झाला असून याचा फटका तुरीच्या उत्पन्नावर होणार आहे. तुरीचे पीक वाचविण्यासाठी शेतक-यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे . यामुळे उत्पादन होण्याच्या पूर्वीच शेतक-यांच्या खिशातून मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होत आहेत .
तूर पिकाला लागवड व मशागत खर्च कमी व बाजारात तूर डाळीला मागणी अधिक या कारणांमुळे अनेक शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. तूर पीक हे शेतक-यांसाठी अतिरिक्त उत्पन्न देणारे पीक मानले जाते आणि सध्या तुरीचे पीक चांगल्या अवस्थेत असून फुलोरा भरात आहे मात्र यावर्षी हवामानाच्या बदलामुळे ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रता यामुळे तुरीवर आळ्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ऐन फलधारणेच्या अवस्थेत रोगट अळ्यांनी पीक कुरतडायला सुरुवात केल्याने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाले आहेत. जर तूर पिकावर अशा अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढत राहिला तर तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर हातातून जाण्याची शक्यता शेतकरी व्यक्त केली जात आहेत. औषधाच्या वाढत्या किंमती, मजुरीच्या खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना तुरीचे उत्पादन कमी झाल्यास आर्थिक लूट आणखी वाढू शकते अशी भीती शेतक-यांकडून व्यक्त होत आहे.

