कोल्हापूर : सत्तेतील मंडळींनी राजकारणासाठी मराठा-ओबीसींमध्ये वाद निर्माण केला. एका बाजूला कुणबी दाखले दिले आणि परत अपात्र ठरवले जात आहेत, ही मराठा समाजाची फसवणूक आहे. मराठा नेते आता महायुतीतील नेत्यांवर टीका करत आहेत. या नेत्यांनी जे पेरलं तेच आता उगवू लागले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले, एखाद्या महिला-भगिनींच्या संदर्भात असे बोलणे योग्य नाही, एखाद्यावर अचानक जबाबदारी पडली तर त्याला तयार व्हायला वेळ लागतो. काँग्रेसने काय बोलले याच्यावर आपण बोलणे योग्य नाही. विरोधक असलो तरी आपल्या बोलण्यात सुसंस्कृतपणा असावा. केंद्र सरकार आता युवकांशी संवाद साधत आहे, ‘जंतर-मंतर’वरील आंदोलनानंतर हा संवाद सुरू झाला आहे; पण देशातील तरुणांमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष आहे.
महायुतीत सगळे आलबेल आहे असे नाही
महायुतीत सगळे आलबेल आहे असे नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटत असावेत. महायुतीतील पक्षांची एकमेकांमध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे. कदाचित, यातून ते नाराज असतील म्हणून भेटून दरेगावला गेले असावेत, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
















