नवी दिल्ली : प्रतिनिधी
कुत्र्याने चावा घेतल्याप्रकरणी आपल्याला २० लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी प्रियांका राय यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने २०२३ मध्ये तयार केलेल्या सूत्राच्या आधारे भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली महानगरपालिकेला (एमसीडी) म्हणणे सादर करावे, असे निर्देश दिले आहेत.
प्रियांका राय यांनी मागणी केली आहे की, १२ सेमीच्या एकूण जखमेसाठी १२ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी. कारण उच्च न्यायालयाने प्रत्येक ०.२ सेमी जखमेसाठी प्रत्येकी २०,००० रुपये देण्याचे सूत्र ठरवले आहे. प्रत्येक दाताच्या खूणासाठी १०,००० रुपये दराने अतिरिक्त ४.२ लाख रुपये मागितले, असा दावा करत माझ्यावरील हल्लयात कुत्र्याने सर्व ४२ दातांनी चावा घेतला. तसेच दुखापतीसाठी भरपाई म्हणून ३.८ लाख रुपये मागितले आहेत, ज्यामुळे त्यांचा एकूण दावा २० लाख रुपये झाला आहे.
मार्च २०२५ मध्ये त्या दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमधील खिरकी व्हिलेज रोडवरून प्रियांका राय दुचाकीवरून जात होत्या. त्या दुचाकीच्या मागे बसल्या होत्या. यावेळी अचानक रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे की, भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे शारीरिक, भावनिक आणि आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. तसेच नुकसानीची रक्कम निश्चित करण्यासाठी त्यांनी २०२३ मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने नुकसानभरपाईसाठी ठरवलेल्या सूत्रांचा हवाला दिला आहे.

