बालभद्रपुरम : वृत्तसंस्था
आंध्र प्रदेशातील एका गावात जीवघेणा आजार पसरला आहे. येथील लोक भीतीच्या छायेत जगत आहेत. बालभद्रपुरम नावाच्या या गावाची जमीन खूप सुपीक आहे. येथे ऊस आणि भातासह अनेक धान्य पिकवली जातात. हे गाव समृद्ध असूनही, आजकाल येथे कॅन्सरचा धोका खूप वाढला आहे. गावातील रस्त्यावर आणि गल्लोगल्ली, परिसरात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे लोक घाबरले आहेत.
जिल्हाधिकारी पी. प्रशांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालभद्रपुरम गावातील बहुतेक रुग्ण हे ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वाइकल कॅन्सरचे आहेत. याशिवाय गावात घसा, आतडे आणि त्वचेच्या कॅन्सरचेही रुग्ण नोंदवले जात आहेत. गावात आतापर्यंत कॅन्सरचे ३२ रुग्ण आढळले आहेत. ही संख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा ३ पट जास्त आहे. बालभद्रपुरम गावात सुमारे १०,८०० लोक राहतात, परंतु तेथे कॅन्सरचे एकूण १०० रुग्ण असल्याचा अंदाज आहे. अनापार्थीचे भाजपा आमदार नल्लमिल्ली रामकृष्ण रेड्डी यांनी कॅन्सरच्या रुग्णांची प्रत्यक्ष संख्या सरकारी आकडेवारीपेक्षा जास्त असू शकते असं म्हटलं आहे.
कॅन्सरच्या वाढत्या घटना लक्षात घेता आंध्र प्रदेश सरकारने एक मोबाईल कॅन्सर स्क्रीनिंग युनिट आणि डॉक्टरांची एक टीम पाठवली आहे. या पथकांनी गावात एक मोठा मेडिकल कँप उभारला आहे. याशिवाय आंध्र प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा आणि पाण्याचे नमुने गोळा केले जात आहेत.
६५ लोकांचा मृत्यू
अधिकृतपणे गेल्या ३ वर्षांत गावात १९ लोकांचा कॅन्सरने मृत्यू झाला आहे, परंतु गावक-यांचा असा दावा आहे की, आतापर्यंत ६५ लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. ३२ कॅन्सर रुग्णांपैकी १७ रुग्णांवर उपचार पूर्ण झाले आहेत. त्याच वेळी, १५ रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत. अनेक लोकांचा असा दावा आहे की, कॅन्सरचे मुख्य कारण जवळच्या कारखान्यांमधून होणारे प्रदूषण आहे. यामुळे हवा आणि पाणी प्रदूषित होत आहे.