बीजिंग : वृत्तसंस्था
चीनमधील वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये सध्या माकडांची अशी काही कमतरता निर्माण झाली आहे की, एका माकडाची किंमत चक्क २५ लाख रुपयांवर पोहोचली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चिनी औषध कंपन्या आणि सरकारी संस्थांमध्ये प्रयोगशाळेसाठी माकडे खरेदी करण्यासाठी मोठी धावपळ उडाली आहे.
२०१८ पर्यंत या माकडांची किंमत काही हजार रुपयांमध्ये होती. २०२१ मध्ये जेव्हा जगभर लसींचे संशोधन सुरू होते, तेव्हा ही किंमत वाढली होती. मात्र, २०२६ च्या सुरुवातीला चीनने बायोटेस्टिंग आणि नाविन्यपूर्ण औषध संशोधनावर भर दिल्याने मागणीने उच्चांक गाठला आहे. शी जिनपिंग सरकारने चिनी कंपन्यांना जागतिक स्तरावर ‘मेडिकल हब’ बनण्याचे उद्दिष्ट दिले आहे, ज्यासाठी दरवर्षी किमान २५,००० ते ३०,००० माकडांची गरज भासत आहे. २०२१ मध्ये जेव्हा असाच तुटवडा निर्माण झाला होता, तेव्हा चीनने कंबोडियातून मोठ्या प्रमाणावर माकडांची तस्करी केल्याचे आरोप झाले होते. आता पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जर चीनने आग्नेय आशियाई देशांतून बेकायदेशीरपणे माकडे मागवली, तर वन्यजीव संरक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. प्राणी हक्क संघटनांनी यावर चिंता व्यक्त केली असून, संशोधनासाठी प्राण्यांचा वापर कमी करण्याची मागणी केली आहे.

