15.7 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeअंतरराष्ट्रीयकॅलिफोर्नियात अग्नितांडव; आणीबाणी, ३ लाख बेघर

कॅलिफोर्नियात अग्नितांडव; आणीबाणी, ३ लाख बेघर

 

लॉस एंजिलिस : वृत्तसंस्था
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस अँजेलिसच्या जंगलात लागलेली आग शहरापर्यंत पोहोचली आहे. आगीमुळे आतापर्यंत ४ हजार ८५६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आगीत सुमारे ११०० इमारती पूर्णपणे जळून खाक झाल्या असून २८ हजार घरांचे नुकसान झाले आहे. आगीच्या वणव्यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे ५० हजार लोकांना तात्काळ घरे सोडण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सुमारे ३ लाख लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने शहरात आणीबाणी जाहीर केली आहे.

हॉलिवूड स्टार्सचे बंगले खाक : लॉस अँजेलिस शहरातील पॉश एरिया असलेल्या पॅलिसेड्समधील अनेक हॉलिवूड स्टार्सचे बंगले या आगीत जळून खाक झाले आहेत. मार्क हॅमिल, पॅरिस हिल्टन, जेमी ली कर्टिस, मँडी मूर, मारिया श्राइव्हर, अ‍ॅश्टन कुचर, जेम्स वूड्स आणि लीटन मीस्टर यांच्यासह अनेक हॉलीवूड स्टार्सच्या घरांना आग लागली. अनेक सेलिब्रिटींना आपले घर सोडावे लागले. लॉस एंजेलिसमधील ब्रेटनवूड भागातील उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनाही घर रिकामे करण्याची सूचना देण्यात आली. लॉस एंजेलिस ही अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेली काउंटी आहे. येथे १ कोटीहून अधिक लोक राहतात. येथील फिल्म इंडस्ट्रीला प्रसिद्ध हॉलिवूड क्षेत्राचे नाव देण्यात आले आहे.

हेलिकॉप्टर, विमानाने फवारणी : कॅलिफोर्नियातील आगीवर हेलिकॉप्टर आणि विमानांच्या सहाय्याने फवारणी करून नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र जोरदार वारे आणि त्यांची दिशा बदलल्याने आग वेगवेगळ्या ठिकाणी पसरत आहे. बचाव पथक हजारो लोकांना सुरक्षित स्थळी नेत आहे. शाळा, सामुदायिक केंद्रे आणि इतर सुरक्षित ठिकाणे आपत्कालीन निवारा म्हणून तयार करण्यात आली आहेत.

सुकलेल्या झाडांना आग लागली : लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया हे शहर पर्वतांमध्ये वसलेले आहे. येथे पाइनची जंगले आहेत. सुकलेली डेरेदार झाडे जळाल्याने आगीचा वणवा पसरत गेला. पुढच्या काही तासांत आगीने लॉस एंजेलिसच्या मोठ्या भागाला वेढले. शहरातील हवा विषारी झाली आहे. येथे ‘एक्यूआय’ ने ३५० ची पातळी ओलांडली आहे. जंगलात आग लागल्यानंतर ताशी १६० किमी वेगाने वाहणा-या ‘सांता सना’ वा-यांनी आग वेगाने वाढविली. साधारणपणे शरद ऋतूत वाहणारे हे वारे खूप उष्ण असतात. याचा सर्वाधिक परिणाम दक्षिण कॅलिफोर्नियावर होतो. या वा-यांचा वेग अजूनही खूप जास्त आहे, त्यामुळे आग सतत पसरत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR