नवी दिल्ली : दिल्ली भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी करत आज निदर्शने केली. भाजप कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यालयाबाहेर ही निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी वॉटर कॅननचा वापर केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर अनेक भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यापूर्वी मंगळवारी, उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळली होती. त्यानंतर केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका हायकोटार्ने फेटाळल्याबद्दल आप नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की, आम्ही सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला नक्कीच न्याय मिळेल, अशी आशा भारद्वाज यांनी बोलून दाखवली आहे.
महागडे वकिल सत्य बदलू शकणार नाहीत
दुसरीकडे दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, अरविंद केजरीवाल महागड्या वकिलांवर करोडो रुपये खर्च करत आहेत, पण सत्य बदलू शकत नाही. अरविंद केजरीवाल यांनी दारू घोटाळ्यात चोरी केली हे सत्य आहे, त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, असे सचदेवा म्हणाले. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण २०२१ शी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांना २१ मार्च रोजी ईडीने अटक केली आहे, तेंव्हापासून केजरीवाल तुरुंगात आहेत.