नागपूर : माजी मंत्री सुनील केदार यांची कारागृहातून सुटका झाल्यावर त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे धंतोली पोलिसांनी त्यांच्यासह शंभरावर समर्थकांविरोधात विविध कलमांसह गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी रॅलीमधील १० वाहने जप्त केली असून काहींना धंतोली ठाण्यात चौकशीसाठी बोलाविण्यात आले. शिवाय गुन्ह्यात एका नव्या कलमाचा समावेशही केला आहे. केदार यांची बुधवारी मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाल्यावर समर्थकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून फटाक्यांची आतषबाजी केली व मिरवणूकही काढली.
दरम्यान सुनील केदार आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांकडून सूचनापत्र देण्यात आले होते. त्यानंतरही कारागृहाबाहेरील प्रतिबंधित परिसरात समर्थकांनी गर्दी केली.
याशिवाय कारागृहात जहाल नक्षलवादी आणि काही दहशतवादी आहेत. तरीही समर्थकांनी जेलच्या समोरील परिसरात गर्दी केली. त्यामुळे पोलिसांनी बुधवारी केदारांसह दहा जणांवर गुन्हा दाखल केला.
मात्र, दुस-याच दिवशी त्याची संख्या वाढून शंभरावर समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय गुन्ह्यात दहशत निर्माण केल्याप्रकरणी भादंविचे कलम १५३ (अ) समाविष्ट केले. विशेष म्हणजे, पोलिसांनी एफआयआरमध्ये गंभीर आरोपही केले आहेत.
न्यायालयाला देणार माहिती
केदारांविरोधात गुन्हा दाखल केल्यावर त्यांनी रॅलीदरम्यान नेमके काय काय झाले? याची तपासणी पोलिसांकडून सुरू आहे. त्यासाठी एक विशेष तपास पथक बनवले असून सा-या घटनाक्रमाबाबत न्यायालयास माहिती दिली जाणार आहे.