पाटणा : केसी त्यागी यांनी जनता दल (युनायटेड) म्हणजेच (जेडीयू) च्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान त्यांच्या जागी राजीव रंजन प्रसाद यांची जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे सरचिटणीस अफाक अहमद खान यांनी पत्र जारी करून याबाबत माहिती दिली आहे.
निवेदनानुसार, राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी राजीव रंजन प्रसाद यांची पक्षाचे नवे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे. जेडीयूचे ज्येष्ठ नेते त्यागी यांची मे २०२३ मध्ये राष्ट्रीय प्रवक्ते तसेच विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यागी यांच्या संघटनात्मक अनुभवाचा फायदा घेण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख नितीश कुमार यांनी त्यांची पक्षाचे विशेष सल्लागार आणि मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे. तथापि, केसी त्यागी यांच्या राजीनाम्यामागे त्यांच्या विधानांमुळे पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील मतभेदांसह इतर अनेक कारणे असू शकतात. अशी चर्चा सुरू झाली आहे.