29.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयकॉंग्रेसला आयकरची पुन्हा नोटीस

कॉंग्रेसला आयकरची पुन्हा नोटीस

आयकर विभागाने केली ३, ५६७ कोटी कराची मागणी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षासमोरील संकटे कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकीकडे मोठ-मोठे नेते पक्ष सोडत आहेत तर दुसरीकडे पक्षासमोर कायदेशीर अडचणी उभ्या राहत आहेत. आता आयकर विभागाने काँग्रेसला नवीन नोटीस बजावली आहे. ज्यामध्ये २०१४-१५ ते २०१६-१७ या वर्षांसाठी १,७४५ कोटींच्या कराची मागणी करण्यात आली आहे. या नव्या नोटिशीसह आयकर विभागाने काँग्रेसकडे एकूण ३,५६७ कोटींच्या कराची मागणी केली आहे. नवीन कराची नोटीस २०१४-१५ (६६३ कोटी रुपये), २०१५-१६ (सुमारे ६६४ कोटी रुपये) आणि २०१६-१७ (सुमारे ४१७ कोटी रुपये) याच्याशी संबंधित आहे.

तपास यंत्रणांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांकडून जप्त केलेल्या डायरीमध्ये असलेल्या थर्ड पार्टी एन्ट्रीवरही काँग्रेसला कर लावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसने शुक्रवारी सांगितले होते की, त्यांना आयकर विभागाकडून एक नोटीस मिळाली आहे, ज्यामध्ये सुमारे १८२३ कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. आयकर विभागाच्या अधिका-यांंनी संबंधित करांच्या मागणीसाठी पक्षाच्या खात्यातून गेल्या वर्षी १३५ कोटी रुपये काढले आहेत.

सरकारी संस्थांना हाताशी धरत भाजप प्रमुख विरोधी पक्षाला आर्थिकदृष्ट्या अपंग करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली असून, सर्व राजकीय पक्षांमध्ये समतोल राखला जावा यासाठी विनंती केली आहे. याआधी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसला दणका दिला होता. चार वर्षांच्या कालावधीसाठी कर अधिका-यांनी त्यांच्याविरुद्ध कर पुनर्मूल्यांकन कार्यवाही सुरू केल्याच्या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळल्या होत्या.

भाजपच्या थर्ड पार्टी
नोंदीवर मात्र कर नाही
काँग्रेस नेत्यांनी असा आरोप केला की, भाजप नेत्यांची नावे असलेल्या इतर डायरीमध्ये थर्ड पार्टी नोंदींवर कोणताही कर लावला गेला नाही. दरम्यान, काँग्रेसच्या खात्यांमध्ये अनेक बेहिशेबी व्यवहार झाल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR