23.7 C
Latur
Tuesday, July 1, 2025
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरातील २२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत

कोल्हापुरातील २२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, ताराराणी आघाडी या चारही पक्षांतील २२ माजी नगरसेवकांनी मंगळवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला.
पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये काँग्रेसच्या शारंगधर देशमुख यांच्यासह तीन माजी महापौर, स्थायी समितीचे दोन माजी सभापती यांचा समावेश आहे.

सत्ता आणणारे किंगमेकर शिंदेसेनेत आल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा निश्चित फडकेल, असा विश्वास व्यक्त करतानाच कोल्हापूर शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

माजी नगरसेवकांनी प्रवेश केल्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे येथून पुढे कोल्हापूरचा विकास हाच अजेंडा घेऊन काम करू. एक कार्यकर्ता असल्याने सर्वसामान्य जनतेला सेवासुविधा देण्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार जयश्री जाधव, सत्यजित कदम यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.

माजी नगरसेवकांनी करेक्ट कार्यक्रम केला आहे. पहिल्या दणक्यातच खटक्यावर बोट ठेवून जाग्यावर पलटी केलंत. यापुढे अजून अनेक कार्यक्रम करायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आपणाला महापालिका जिंकायची आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा शिवसेनामय- आबिटकर
कोल्हापुरात आता पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर असे सगळेच चित्र शिवसेनेचे होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्वच निवडणुका ताकदीने लढवूया. मला विश्वास आहे उपमुख्यमंत्री शिंदे आपल्या सगळ्या प्रश्नांना ताकद देतील, अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR