आ. वडेट्टीवार, खा. राऊत यांचा पलटवार
मुंबई : प्रतिनिधी
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत खा. अमोल कोल्हे यांनी ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही आणि कॉंग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून ठाकरे गटाचे खा. संजय राऊत आणि कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आता ठिणगी पडल्याचे चित्र आहे. राऊत यांनी आमचा पक्ष लढणा-यांचा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढत राहू, असे म्हटले, तर डॉ. कोल्हेंनी कॉंग्रेस पक्षाला सल्ला देण्यापेक्षा आपल्या पक्षाकडे अधिक लक्ष द्यावे, असा सल्ला दिला.
खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत राज्याची सद्यस्थिती पाहिली तर ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही. त्यासोबतच पराभवानंतर कॉंग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही. आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत. आता आपल्याला लढायला संधी आहे. सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे. त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे, असे विधान केले. याच विधानाने महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे.
यावर कॉंग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सरकार ईव्हीएमच्या भरोशावर आले आहे. जनतेने दिलेल्या बहुमतामुळे ते आलेले नाही. महाविकास आघाडीतील पक्ष आपापल्या परीने काम करीत आहेत. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी आपल्या पक्षाकडे थोडे अधिक लक्ष द्यावे, आम्हाला सल्ला कमी द्यावा, असा टोला लगावला.
बचेंगे तो और लढेंगे
ही भूमिका शिवसेनेची
राज्यात बचेंगे तो और लढेंगे ही भूमिका कायम शिवसेनेने घेतली आहे. आम्ही अजूनही जमिनीवरच आहोत. लढणा-यांचा आमचा पक्ष आहे. आम्ही कधी झुकलो नाही. आमचे २० आमदार आहेत. त्यातील एकाचेही फुटलेल्या गटात सहभागी व्हायचे, असे मत नाही. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात लढत राहू, असे प्रत्युत्तर शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी दिले.