कौसडी : शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून जिंतूर तालुक्यातील मोठे गावे असणा-या बोरी आणि कौसडी गावाला कोट्यावधी रुपयाची जलजीवन पाणीपुरवठा योजना मंजूर केली. मात्र या योजनेचे काम करणा-या ठेकेदारांनी हलगर्जीपणा केल्यामुळे या योजनेचे पाणी अद्यापही नागरिकांच्या घरी पोहोचलेले नाही. सध्या या दोन्ही गावाला तीव्र पाणीटंचाई असून गेल्या दोन महिन्यापासून या ठिकाणी ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.
या योजनेच्या जीवन प्रधिकरण अधिका-यांना संपर्क केला असता त्यांना संपर्क होऊ शकला नाही. या योजनेचे काम करणा-या ठेकेदाराचा हलगर्जीपणा होत असल्यामुळे ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. या योजनेच्या कामावर देखरेख करणा-या वरिष्ठ अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे या योजनेचे काम गेल्या एक महिन्यापासून ठप्प झाले असून वरीष्ठ अधिका-यांनी चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कौसडी येथील जलजीवनच्या कामाकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे कामाचा बोजवारा उडाला असल्याचे नागरीकांत बोलले जात आहे. कौसडी येथील जल जीवन योजनेची काम अनेक दिवसापासून सुरू आहे. मात्र हे काम कासव गतीने होत असल्यामुळे या कामाकडे ग्रामपंचायतचे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु ग्रामपंचायत याकडे लक्ष देत नसल्यामुळे या कामाचा बोजारा उडाला आहे. परिणामी कौसडी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रत्येकी गावाला दोन-दोन टँकर व्यवस्था केली आहे. ग्रामपंचायत कर्मचा-या मार्फत गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
या योजनेच्या कामासाठी कल्पना धरणापासून जलवाहिनी टाकून गावात पाणी आणण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र हे काम अर्धवट आहे. या योजनेसाठी गावात मुख्य ठिकाणी जल कुंभ बांधण्यात येत आहे. या जलकुंभाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. गावातील अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुद्धा अर्धवट अवस्थेमध्ये आहे.
सरकारी टँकरचे पाणी खाजगी पाणीपुरवठा योजनेला
कौसडी येथे तीव्र पाणीटंचाई घेत तहसीलदारांनी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन टँकरची मंजुरी दिली. परंतु येथील सरपंचांनी हे पाणी एका खाजगी आणि पुरवठा योजनेला विकत दिले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी चौकशी करून हे पाणी सर्वसामान्य जनतेला वाटप करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.