लातूर : प्रतिनिधी
खरीप हंगामाच्या हंगामाच्या पेरणीसाठी शेतक-यांकडून मशागतीची कामे सध्या अंतिम टप्यात आहेत. कृषि विभागानेही खरीम हंगामासाठी बी-बियाणे, खते विक्रीसाठी उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. तसेच शेतक-यांना बिजोत्पादन प्रक्रीया कशी करावी याचेही प्रत्यक्षिक स्वरूपात गावोगावी मोहिमेच्या माध्यमातून दिली जात आहे. विशेष म्हणजे कृषि विभागाने मूग, उडीद, तूर या कडधान्याच्या पे-यावर अधिक लक्ष दिले जात असून शेतक-यामध्येही याची जनजागृती करण्यात येत आहे.
खरीपाच्या पेरणीपुर्व शेतातील मशागतीची कामे शेतक-यांनी हाती घेतली असून ती अंतीम टप्यात आहेत. शेतकरी अधुनिक तंत्रज्ञाचा वापर करत शेतीच्या मशागतीची कामे ट्रॅक्टरद्वारे पूर्ण करत आहेत. तर ज्या शेतक-यांकडे बैल बारदाना आहे. त्यांनी सकाळी व सायंकाळच्या सुमारास शेतात नांगरनी, मोगडा, कुळव चालवत मशागतीची कामे करत आहेत. पावसाळा ८ ते १० दिवसावर येऊन ठेपल्याने शेतक-यां शेतीची कामे मार्गी लावण्याचे काम सुरू आहे.
जिल्ह्यात यावर्षी ५ लाख ९५ हजार ५८३ हेक्टर क्षेत्रावर खरीपाचा पेरा होण्याची शक्यता आहे. यात सोयाबीनचा पेरा ४ लाख ८५ हजार ६६४ हेक्टर क्षेत्रावर होणार आहे. ७१ हजार ६४३ हेक्टर क्षेत्रावर तुर, ७ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर मुग, ७ हजार ५१० हेक्टर क्षेत्रावर उडीद, ५ हजार ७९० हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, ५११ हेक्टरवर बाजरी, २ हजार हेक्टर ५८४ क्षेत्रावर मका, ६० हेक्टरवर साळ, २२७ हेक्टर क्षेत्रावर भुईमुंग, २४६ हेक्टर क्षेत्रावर तीळ, ५ हेक्टरवर सुर्यफूल आदी पिकांचा पेरा होणे अपेक्षित आहे. तसेच १४ हजार १४४ हेक्टर क्षेत्रावर कापूसाची लागवड पेरणी होणे अपेक्षित असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
गेल्या वर्षी ५,८८,९९६ हेक्टरवर खरिपाचा पेरा
जिल्ह्यात गेल्यावर्षी ५ लाख ८८ हजार ९९६ हेक्टरवर शेतक-यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या होत्या. यात सर्वाधिक ४ लाख ८५ हजार १८१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. ७० हजार ६६७ हेक्टरवर तूर, ७ हजार ९९७ हेक्टरवर मूग, ६ हजार १८३ हेक्टरवर उडीद, २ हजार ८४९ हेक्टरवर ज्वारी, २४५ हेक्टरवर बाजरी, १ हजार ८२४ हेक्टरवर मका, साळ ५९ हेक्टवर, २२२ हेक्टरवर तिळ, १५९ हेक्टरवर भूईमुग, सुर्यफूल ५ हेक्टर, कारळं ६० हेक्टरवर अशा प्रकारे १००.४९ टक्के क्षेत्रावर खरीपाचा पेरा झाला होता.
खरीप जनजागृतीच्या ४ हजार मोहिमा
लातूर जिल्ह्यात खरीप हंगाम पूर्वतयारी शेतक-यांकडून सुरू आहे. त्यासाठी कृषि विभागाने बियाणे उगवण शक्ती तपासणे, बिज प्रक्रीया करणे, अशा स्वरूपाचे उपक्रम सध्या जिल्हाभर सुरू आसून ३५५ अधिकारी व कर्मचा-यांनी ४ हजार २१ मोहिमा पार पाडल्या आहेत. या अधिका-यांकडून मेळावे, खरीपाच्या संदर्भाने दि. १५ एप्रिल ते १५ जून पर्यंत मोहिमा घेऊन खरीप हंगामातील पेरणीच्या संदर्भाने उपाय योजना केल्या जात असल्याचे कृषि विभागाने सांगीतले.
मूग, उडीद, तुरीचा पेरा वाढविण्यावर भर
लातूर जिल्ह्यात खरीप हंगामात दरवर्षी सोयाबीनचा अधिक पेरा होता. या वर्षी सोयाबीनचे क्षेत्र २ हजार हेक्टरने कमी करून मूग, उडीद, तूर यांच्या क्षेत्रात वाढ करण्याचे नियोजन केले आहे. तसेच एल निनोच्या धर्तीवर विशेष मोहिम घेऊन काय उपाय योजना करायच्या याचे नियोजन केले आहे. यात उताराच्या शेतीमध्ये आडवी पेरणी ३० टक्के क्षेत्रावर करणे, बीबीएफ रूंद सरी वरंबा पध्दतीने २० टक्के क्षेत्रावर पेरणी करणे, ५ टक्के क्षेत्रावर मृत सरी काढणे, १० टक्के क्षेत्रावर टोकण पध्दतीने बियाणांची लागवड करणे या संदर्भाने शेतक-यांना मार्गदर्शन केले जात आसल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली.
‘एल-निनो’ च्या प्रतिकूल परिणामाची शक्यता
लातूर जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. तर यावर्षी भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार २०२६ च्या मान्सूनवर ‘एल-निनो’ चा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामात उद्भवणा-या परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना कराव्या लागण्याची शक्यता आहे.
















