चाकूर: अ. ना. शिंदे
तालुक्यात पाणीटंचाईच्या काळात खाजगी वॉटर प्लांट्समधून जार किंवा मिनरल वॉटर सप्लाय आणि जलस्रोतांची स्थिती अत्यंत संवेदनशील आणि आव्हानात्मक अशीच आहे . तालुक्यात कमी पाऊस आणि भूजल पातळीत लक्षणीय घट झाल्याने टंचाईच्या काळात खाजगी वॉटर प्लांट्सवर थेट परिणाम होतो. कूपनलिका किंवा खाजगी विहिरींमधून पाणी उपसा करतात. भूजल पातळी खालावल्यामुळे या प्लांट्सना कच्च्या पाण्याचा मोठा तुटवडा जाणवतो. पाण्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे प्लांट्सना लांबून टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागते, ज्यामुळे त्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होते.
खाजगी वॉटर प्लांट्स मधून पुरवले जाणारे पाणी शुद्ध आणि पिण्यायोग्य आहे की नाही, हे तपासण्यासाठी अत्यंत कडक आणि कायदेशीर ठोस तपासणी यंत्रणा अस्तित्वात आहे. कोणत्याही खाजगी कंपनीला किंवा प्लांटला बीआयएस आणि एफएसएसएआय परवानगीशिवाय पाणी विकता येत नाही. चाकूर शहर किंवा तालुक्यासाठी स्वतंत्र एफडीए कार्यालय नसून, लातूर येथील कार्यालयातील अधिकारीच या संपूर्ण भागातील अन्न व पाण्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवतात. वॉटर प्लांटची नियमित तपासणी झाली नाही आणि तेथून दूषित पाणी पुरवले गेले, तर नागरिकांच्या आरोग्याला अत्यंत गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. दूषित पाणी हे अनेक आजारांचे थेट मूळ आहे.या तपासण्या नियमित होतात का हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे.
















