22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रखासदार निधीतून दारू-व्हिस्की देणार

खासदार निधीतून दारू-व्हिस्की देणार

चंद्रपूरच्या लोकसभा महिला उमेदवाराचे अजब आश्वासन

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे या भागात सध्या प्रचाराला वेग आला आहे. त्यात उमेदवारांची धावपळ सुरू आहे. कुणी पदयात्रा काढत आहे, तर कुणी घरोघरी प्रचार करत आहे. पण यातच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात उभे राहिलेल्या एका महिला उमेदवाराने अजब आश्वासन मतदारांना दिले आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार कायम आश्वासनांची खैरात प्रचार काळात करतात. त्यात या महिला उमेदवाराने दिलेले आश्वासन ऐकून सर्वच अचंबित झाले आहेत.

या महिला उमेदवाराचे नाव आहे वनिता राऊत, त्या अखिल भारतीय मानवतावादी पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चंद्रपूरात गेले कित्येक वर्ष दारुबंदी आहे. त्याचा फायदा या महिला उमेदवाराने प्रचारासाठी घेतला आहे. वनिता राऊत म्हणाल्या की, गाव तिथे बिअर बार, पिणा-याकडे आणि विक्री करणा-याकडे परवाना असायला हवा. कायदेशीर मार्गाने दारूविक्री झाली पाहिजे. अजून पर्यंत सरकारने त्या गोष्टी केल्या नाहीत. त्यामुळे मला पुन्हा निवडणुकीत उभे राहायला लागले असे त्यांनी सांगितले.

इतकेच नाही तर सरकार आनंदाचा शिधा वाटते, रेशन कार्डवर साड्याही मिळतात. जर चंद्रपूरच्या लोकांनी मला खासदार बनवले तर आनंदाचा शिधासोबत व्हिस्की, बिअर जी काही उच्च दारू आहे. ती माझ्या खासदार निधीतून व्हिस्की, दारू देईन असे आश्वासन दिले आहे. २०१९ च्या चिमूर विधानसभा निवडणुकीवेळीही वनिता राऊत उभ्या होत्या. त्यावेळीही गाव तिथे बिअरबार असे आश्वासन त्यांनी लोकांना दिले होते. चंद्रपूरला शेजारील इतर जिल्ह्यात दारूबंदी नाही मग चंद्रपूरकरांनी काय केले आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूरकरांनी वनिता राऊत यांच्या आश्वासनाला फार दाद दिली नाही. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र पुन्हा एकदा वनिता राऊत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांनी लोकांना पुन्हा साद घातली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यावेळी भारतीय जनता पार्टी महायुतीकडून सुधीर मुनगंटीवार हे रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीने या निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे या दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्येही ही लढत होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR