26.1 C
Latur
Friday, August 1, 2025
Homeलातूरगंज गोलाईत अतिक्रमणांवर कायमस्वरुपी निगराणी!

गंज गोलाईत अतिक्रमणांवर कायमस्वरुपी निगराणी!

लातूर : प्रतिनिधी
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई व परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात ‘अतिक्रमण’वर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यामुळे अतिक्रमणावर अंकुश ठेवण्यासाठी गंजगोलाईत कायमस्वरुपी निगरानी केली जात आहे.
लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार श्रीमती मानसी मीना यांनी घेतल्यानंतर लातूर शहरात अतिक्रमणविरोधी मोहिमेला गती आली. गेल्या एक महिन्यात महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शहरातील गंजगोलाईसहीत छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, मेन रोड, मध्यवर्ती बसस्थानकसमोर, महात्मा गांधी चौक, औसा रोड, दयानंद गेट, खाडगाव रोड, जुना रेणापूर नाका, पु. अहिल्यादेवी होळकर चौक, सुमारे १५० हून अतिक्रमणे काढली. शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यात आले. अतिक्रमणविरोधी मोहीम ही कायमस्वरुपी असणार आहे. गंजगोलाईत अतिक्रमण होणार नाही, यासाठी कायमस्वरुपी निगरानी ठेवली जात आहे. गंजगोलाईत अतिक्रमणविरोधी पथकाचे एक वाहन आठ-दहा दिवस कायमस्वरुपी ठेवण्यात आले आहे, अशी माहिती अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख रवि कांबळे यांनी दिली.
महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी मीना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी बुधवारी सायंकाळी अचानक गंजगोलाईला भेट देऊन पाहणी केली. यावेळी हातगोडे व्यावसायिक आणि ऑटोरिक्षाचालकांना वाहतूकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे सक्त निर्देश दिले. नेमून दिलेल्या जागेतच व्यवसाय करण्याचे आणि थांबा निश्चित केलेल्या ठिकाणीच ऑटोरिक्षा थांबवण्याचे आवाहन त्यांनी केले.  नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा आयुक्त मानसी मीना यांनी दिला. यावेळी आयुक्त व पोलीस  अधीक्षकांनी गंजगोलाई, बाजारपेठ तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौकाची पाहणी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR