पोलिसांची कारवाई, ३६ लाख रुपयांचे बक्षीस केले होते जाहीर
गडचिरोली : प्रतिनिधी
अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या पाच नक्षलवाद्यांपैकी तिघांना अटक तर दोघांना गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भामरागड तालुक्यातील अबूझमाडच्या बिनागुंडा परिसरात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर तब्बल ३६ लाख रुपयाचे बक्षीस होते. त्यांच्याकडून एक स्वयंचलित एसएलआर रायफल, दोन भरमार बंदूक आणि ४ रायफल असे ७ हत्यार जप्त केले.
उंगी होयाम ऊर्फ सुमली, पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी, देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता असे अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावे असून इतर दोघे वयाचा ठोस पुरावा नसल्याने त्यांना ताब्यात घेतले आहे. भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरात गडचिरोली पोलिसांचे सी-६० कमांडो आणि सीआरपीएफ बटालियन ३७ चे जवान अभियानावर असताना गोपनीय माहितीच्या आधारे गावाला घेराबंदी करण्यात आली. तेव्हा काही नक्षल गणवेशात आणि काही साध्या वेशातील संशयित पोलिस पथकावर घातपात घडवण्याची योजना आखत असल्याचे समोर आले. यातील काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले तर पाच जणांना ताब्यात घेतले.
विविध माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या जहाल माओवादी ‘देवसू’सह अन्य तीन माओवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसर्पण केले. २०१७ पासून विविध माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या जहाल माओवादी देवसूवर ३.५० लाख रुपयांचे बक्षीस होते तर गोंदिया जिल्ह्यात २०२४ पासून सक्रिय असलेल्या अन्य ३ माओवाद्यांनीही आत्मसमर्पण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
नक्षल्यांंना पकडण्यासाठी
असे बक्षीस केले होते जाहीर
उंगी होयामवर १६ लाख, पल्लवी मिडीयमवर ०८ लाख रूपयांचे तर देवे पोडीयाम ०४ लाख रूपयांचे बक्षीस होते. इतर दोघांवर ८ लाख रुपयांचे बक्षीस असल्याची माहिती समोर आली आहे.