मुंबई : प्रतिनिधी
आजपासून लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. बाप्पाची पूजा आणि आरास करण्यासाठी फुलांची मोठी मागणी असते. आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने दादर फूल मार्केटमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सकाळपासूनच नागरिकांनी खरेदीसाठी तुफान गर्दी केली.
सजावटीसाठी लागणारे साहित्य, पूजेसाठी लागणा-या वस्तू, नैवेद्य, फळे, फुले आणि बाप्पाच्या आवडीच्या २१ भाज्यांच्या खरेदीसाठी गणेशभक्तांनी फूल मार्केटमध्ये तोबा गर्दी केली आहे. बाप्पाच्या सजावटीसाठी लागणा-या वेगवेगळ्या फुलांची मागणी वाढल्याने दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडत आहे. त्याचा फटका फुलांच्या शेतीला बसला आहे. मुंबईतही पावसाची रिमझिम सुरू आहे. दादर फूल मार्केटलाही पावसाचा फटका बसला आहे. विक्रीसाठी आणलेली फुले मोठ्या प्रमाणात भिजली असल्याने सडून जात आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांचे दर दुप्पट ते पाच पट वाढले आहेत. यातच प्लास्टिकच्या फुलांची वाढलेली खरेदी यामुळे देखील मार्केटमधील व्यापारी त्रस्त आहेत.