पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी
संशयाचे भूत डोक्यात शिरले की माणूस कोणत्या स्तराला जाऊ शकतो, हे सांगता येत नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये संशयामुळे सहा वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट झाला. धक्कादायक म्हणजे, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडचा बर्थडेच्या दिवशीच जीव घेतला. लॉजवर दोघांनी बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन केले. त्यानंतर त्याने ब्लेडने सपासप वार करत जीव घेतला. इन्स्टाग्रामवरून दोघांची ओळख झाली होती, त्यातून प्रेम फुललं. पण गेल्या काही दिवसांपासून गर्लफ्रेंड दुस-याच्या प्रेमात असल्याचा संशय तरुणाच्या मनात आला आणि त्याने भयानक पाऊल उचलले.
पिंपरी-चिंचवड शहरात प्रियकराने प्रेयसीची लॉजमध्ये ब्लेडने वार करून हत्या केली आहे. प्रियकराने लॉजमध्ये प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर चाकू आणि ब्लेडने वार करत निर्घृण हत्या केली. वाकड येथील लॉजवर शनिवारच्या दुपारी ही घटना घडली. प्रेयसी दुस-याच व्यक्तीच्या प्रेमात पडली, असा संशय प्रियकराला होता. त्या संशयातून त्याने हे भयानक कृत्य केले.
हत्या केल्यानंतर प्रियकर हा पुण्यातील कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. मेरी तेलगू असे प्रेयसीचे नाव आहे तर दिलावर सिंग आरोपीचे नाव आहे. डी-मार्टमध्ये काम करणारी मेरी आणि हॉटेल व्यावसायिक दिलावर सहा वर्षांपासून प्रेमात होते. इन्स्टाग्रामवरून त्यांची मैत्री झाली, पुढं एकमेकांवर प्रेम जडलं. आयुष्यभर सोबत राहण्याच्या शपथा घेणा-या प्रेमाचा संशयातून शेवट झाला. या घटनेनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी फोन करून सांगितले की, एक इसम हा पोलिस स्टेशनला आला, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, त्याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते परंतु ती त्याचा विश्वासघात करून दुस-यासोबत संबंध ठेवत आहे असा त्याला संशय आहे. त्यामुळे तिला आज वाकड पोलिस स्टेशन हद्दीत काळाखडक येथील लॉजवर दुपारी नेले. तिचा मोबाईल चेक केला असता दुस-यासोबत फोटो दिसल्याने राग आला आणि त्याने सोबत आणलेल्या चाकू व ब्लेडने ठार मारले.