मुंबई : प्रतिनिधी
केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील युती-आघाड्यांमध्ये निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून महायुती सरकारने आज त्यांच्या कार्यकाळाचे रिपोर्ट कार्ड प्रकाशित केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थिती होते.
दरम्यान महायुतीच्या या रिपोर्ट कार्डमध्ये सरकारने त्यांच्या कार्यकाळात महिला, तरुण, शेतकरी, सरकारी कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, रोजगार, आरोग्य, उद्योगधंदे, शहरी पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास आणि सांस्कृतिक वारसा या क्षेत्रात काय काय काम केले आहे, त्याबाबत सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा शंखनाद झाला म्हणत आपल्या मनोगताला सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले की, राज्यात स्थगिती सरकार जाऊन गती सरकार आल्यापासून राज्यात चौफेर काम सुरू आहे.
आम्ही २०१४ ते २०१९ या काळात सुरू केलेल्या अनेक योजना महाविकास आघाडीने बंद केल्या. त्याचप्रमाणे यावेळीही त्यांचे सरकार आले तर महायुतीने सुरू केलेल्या अनेक योजना ते बंद करतील. यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्र हे गुजरातपेक्षा पुढे असून महाविकास आघाडी याबाबत गैरसमज पसरवत आहे, असे सांगितले.