पंतप्रधान मोदींनी केले विजेत्यांचे अभिनंदन
गांधीनगर : वृत्तसंस्था
गुजरातमध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. राज्यातील एकूण ६८ पालिकांची निवडणूक पार पडली. यापैकी ६० पालिकांमध्ये भाजपने बहुमत मिळविले. कॉंग्रेसला फक्ता एका नगरपालिकेत विजय मिळविता आला तर आम आदमी पक्षाला एकाही पालिकेत विजय मिळालेले नाही. यासोबतच समाजवादी पार्टीने दोन पालिकांमध्ये विजय मिळविला. तसेच ३ पालिकांमध्ये टाय झाली. तसेच एका पालिकेत अपक्षांनी वर्चस्व राखले. तसेच एका पालिकेत कोणालाही बहुमत मिळाले नाही.
मागील निवडणुकीत भाजपने ८६ पैकी ५१ नगरपालिकांमध्ये विजय मिळविला होता. यावेळी हा आकडा ६० पर्यंत पोहोचला आहे. स्थानिक पालिकांमध्ये भाजपने सर्वाधिक १४०३ जागा जिंकल्या, कॉंग्रेसने २६०, सपाने ३४, आपने २८ आणि बसपाने १९ जागांवर विजय मिळविला तर १५१ जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.
या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातवासीयांचे अभिनंदन केले असून, गुजरातमधील आपले गड आणखी मजबूत झाले आहेत. गुजरातचे भाजपसोबत असलेले नाते केवळ अतूटच नाही, तर सातत्याने घट्ट होत चालले आहे. राज्यातील निवडणुकीत भाजपला पूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल गुजरातच्या जनतेचे आभार मानतो, असे पंतप्रधान म्हणाले.