गांधीनगर : वृत्तसंस्था
८ मे रोजी सलग दुस-या दिवशी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. कच्छ सीमेवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करताना तीन ड्रोन पाडण्यात आले. गुजरातच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याने राज्यातील १८ जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आले असून भूज विमानतळ लष्कराने ताब्यात घेतले आहे.
दरम्यान १८ जिल्ह्यांत अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, भरूच, भावनगर, डांग, जामनगर, जुनागढ, खेडा, कच्छ, मेहसाणा, पंचमहाल, राजकोट, साबरकांठा, सुरत, सुरेंद्रनगर आणि वडोदरा ही आहेत. बनासकांठा, कच्छ आणि पाटणच्या सीमावर्ती भागातील गावांमध्ये गुरुवारी रात्री ब्लॅक आऊट करण्यात आले. मात्र, सकाळी वीजपुरवठा सुरू करण्यात आला.
आपत्कालीन बैठक : मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गांधीनगर येथील आपत्कालीन ऑपरेशन सेंटरमध्ये एक बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी विविध विभागांचे वरिष्ठ सचिव आणि संबंधित जिल्ह्यांचे प्रशासकीय प्रमुख, पोलिस अधिकारी इत्यादींसोबत आढावा बैठक घेतली. सुरक्षेचा विचार करून, गुजरातच्या सीमावर्ती गावांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील सर्व आरोग्य कर्मचा-यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सुरक्षा व्यवस्थेत वाढ : राज्यातील ज्योतिर्लिंग सोमनाथ, शक्तिपीठ अंबाजी आणि द्वारका मंदिर यासारख्या धार्मिक स्थळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सोमनाथ मंदिराला आधीच झेड प्लस सुरक्षा आहे. याअंतर्गत येथे त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे. यासोबतच येथे बॉम्ब आणि श्वान पथके देखील तैनात आहेत.
मच्छिमारांना ताकीद : ५०० हून अधिक मच्छिमारांना परत बोलावण्यात आले आहे. कच्छमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मच्छिमारांना परत बोलावण्यात आले आहे. कच्छच्या सीमावर्ती भागातील नारायण सरोवर, जखौ आणि लखपत या सागरी क्षेत्रातील मच्छिमारांच्या सर्व हालचालींवर पुढील आदेश येईपर्यंत तात्काळ बंदी घालण्यात आली आहे.
सागर किनारी सैन्य तैनात : द्वारका समुद्रकिना-यावर आघाडीवर सैन्य तैनात करण्यात आले आहे. भारतासोबत झालेल्या प्रत्येक युद्धात पाकिस्तानने द्वारकेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच द्वारका मंदिराच्या संपूर्ण सागरी परिसरात सैन्य दल तैनात करण्यात आले आहे. द्वारका आणि ओखा समुद्रकिना-यांवरही सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. सागरी पोलिसांनीही या समुद्रकिना-यांवर गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.
हेलिकॉप्टरसह जहाजे तैनात : हजिराच्या किनारी भागातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हजिरा बंदराच्या किनारपट्टीवर सुरक्षा यंत्रणाही तैनात करण्यात आल्या आहेत. येथेही नौदल कर्मचारी जहाजे आणि हेलिकॉप्टरसह तैनात आहेत. याशिवाय, समुद्राच्या १२ मैलांच्या परिघात तटरक्षक दल तैनात करण्यात आले आहे.
गुजरातमधील १८ जिल्ह्यांत हाय अलर्ट
- भूज विमानतळ लष्कराच्या ताब्यात - सोमनाथ-द्वारका मंदिरासह सर्व बंदरांच्या सुरक्षेत वाढ