नांदेड : प्रतिनिधी
शहरातील गुरुद्वाराजवळील शहिदपुरा येथे झालेल्या गोळीबार, खून, जिवघेणा हल्ला या प्रकरणात हल्लेखोराची ओळख पटली आहे. आता पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार हा गुन्हा आता तपासासाठी दहशतवाद विरोधी पथक(एटीएस) छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
नांदेड शहरातील गुरूव्दाराजवळील गेट क्र. ६ शहिदपुरा येथे पॅरोल रजेवर आलेला कैदी गुरमितसिंघ राजासिंघ सेवादार वय ३५ आणि रविंद्रसिंघ दयालसिंघ राठोड ३० या दोघांवर गोळीबार झाला. ते दोघे स्कुटीवरून जात होते. गुरूमितसिंघ सेवादारचे घर शहिदपु-यात आहे. निळ्या रंगाचे जॅकेट परिधान केलेल्या हल्लेखोराने गोळीबार करून तो दुचाकीवरून पळून गेला. जखमी अवस्थेतील राठोडने आपले दुचाकी पळवत रुग्णालय गाठले. उपचारादरम्यान रविंद्रसिंघ राठोडचा मृत्यू झाला. या संदर्भाने वजिराबाद पोलिस ठाण्यात गुरमितसिंघ सेवादारच्या जबाबावरून गुन्हा क्रमांक ६२/२०२५ दाखल करण्यात आला होता.
वजिराबादचे पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय अनेक पोलिस अधिकारी आणि अनेक कर्मचा-यांनी तपासात परिश्रम घेत घटनेचा छडा लावला. दि. १३ फेबु्रवारी रोजी मनप्रिसिंघ उर्फ मन्नू गुरूबक्षसिंघ ढिल्लो ३१, हरप्रितीसिंघ उर्फ हॅप्पी बाबुसिंघ कारपेंटर या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने २० फेबु्रवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. या तपासात एनआयएने हल्लेखोराची ओळख पटवल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी सांगितली आहे.
हल्लेखोराला वाहन पुरविणे, मोबाईल पुरविणे, सिम कार्ड पुरविणे, त्याला गुरमितसिंघच्या घराची रेखी करण्यासाठी मदत करणे यासाठी मदत करणा-्यांची यादी तयार झाली होती. पोलिस महासंचालकांच्या आदेशान्वये हा गुन्हा आता पुढील तपासासाठी दहशतवाद विरोधी पथक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. नांदेड पोलिस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलिस अधिक्षक अबिशानकुमार यांनी नांदेड पोलिसांचे या उत्कृष्ट कारवाईसाठी कौतुक केले.