पूर्णा : सुमारे १० कोटी रुपये खर्च करून तयार केल्या जाणा-या माटेगांव-आहेरवाडी-वडगांव रस्त्याचे काम कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे करीत असल्याचा आरोप करीत परिसरातील ग्रामस्थांनीच सा.बां विभाग विरोधात रोष व्यक्त करत काम रोखले आहे.
परभणी-हिंगोली जिल्हा जोडणा-या पूर्णा तालुक्यातील नावकी-आहेरवाडी-वडगाव-रिधोरा रस्ता मजबुतीकरण, काँक्रीटकरण, डांबरीकरण, ओढ्यातील पुल आदीं कामास १ डिसेंबर २०२३ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार संबंधित काम हे दोन टप्प्यांत विभागून याचे कार्यारंभ आदेश पूर्णा व हिंगोली येथील कंत्राटदारास देण्यात आले आहे.
काही महिन्यांपूर्वी सदरील कामास प्रारंभ करण्यात आला. या कामात रस्त्यावर पडलेले खड्डे पुर्णत: खोदुन त्यात एम.पी.एम. ७५ मी.मी जाडीचा थरासह ओजिसी. २० मी.मी जाडीचा थर त्यात कारपेट, सिलकोट करणे, कठीण मुरुमाच्या साईडपट्टी भरुन सुमारे ६ इंची मजबूत डांबरीकरण करुन रस्ता तयार करणे, पुलाच्या कामात १२०० मीमी.चे दोन सिडी पाईप टाकून बांधकाम करणे तसेच ७०० मीटर लांबीचे आहेरवाडी व वडगांव गावातुन सिमेंट काँक्रीटचा रस्ता त्यामध्ये ३०० मी.मी.कठीण मुरुम अंथरुन दबई करुन त्यावर २०० मी.मी.जाडीचे जिएसबी.१०० मीमी.जाडीचा डीएलसी तसेच पिक्युसी.३० मी.मी.थर तयार करावयाचे आहे.
सा.बां विभागाच्या अधिका-यांनी सदरील काम कंत्राटदारांकडून आपल्या प्रचलीत मापदंडानुसार करवून घेणे बंधनकारक होते. प्रत्यक्षात मात्र तसे होत नसल्याची ओरड परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. याकडे आहेवाडी वडगांव, सुरवाडी येथिल ग्रामस्थांनी सा.बां विभागाचे लक्ष वेधले होते. दि.१४ एप्रिल रोजी संबंधित रस्त्यावर परिसरातील छगनराव मोरे, साहेबराव वाटोळे, सुभाष मोरे, मनोहर खंदारे, दत्तराव भालेराव, नवनाथ घाटोळ, संभाजी मोरे, राम भालेराव, डिगंबर खंदारे, जगन्नाथ खंदारे, अनिल खंदारे,राजु खंदारे आदीं शेकडो ग्रामस्थांनी रस्त्याचे काम रोखले. सदरील कामाची चौकशी करून दर्जेदार काम करण्याची मागणी स्थानिक सा.बां विभागाच्या अधिका-यांकडे करण्यात आली आहे.