लातूर : प्रतिनिधी
मुलगा शाळेतून घरी आला की त्याने अभ्यासाला बसावे, अशी पालकांची अपेक्षा असते. परंतु, तो अभ्यासाला बसतच नाही. उलट त्याच्या खोडकरपणाचा सर्वाधिक त्रास पालकांना होतो. मग उगीच कटकट नको म्हणुन पालक ‘कोचिंग सेंटर’चा पर्याय हुडकतात. ‘कोचिंग सेंटर’मध्ये तरी मुलगा व्यस्त राहील, अशी मानसीकता पालकांची असल्यामुळेच ‘कोचिंग सेंटर’ला कारण नसताना महत्व आले. आम्ही तर शाळेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यात कुठेच कमी पडत नाहीत, असे लातूर शहरातील मुख्याध्यापक, शिक्षकांचे म्हणणे आहे.
केंद्र शासनाने इयत्ता दहावीच्या खालील म्हणजेच १६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना ‘कोचिंग सेंटर’मध्ये प्रवेश देण्यास मनाई केली आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयावरुन शिक्षक, पालक, विद्यार्थी ते ‘कोचिंग सेंटर’चालकांपर्यंत एकच चर्चा सध्या आहे ती खरेच ‘कोचिंग सेंटर’ची आवश्यकता आहे की नाही. या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे वेगळे प्रश्न आहेत तर पालकांचे वेगळे. शिक्षकांचे निराळे तर ‘कोचिंग सेंटर’चालकांचे विभीन्न प्रश्न आहेत. परुंतु, आम्ही आमच्या स्तरावर कसे योग्य आहोत, हे मात्र अवर्जुन सांगण्याचा प्रयत्न होतो आहे.
एका नामांकीत शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले, शाळांत गुणवत्ता आहे. पण ‘कोचिंग सेंटर’ला जाण्याचा ट्रेंड खुप जुना आहे. आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण देतो तरीही पालकांचा शाळांविषयीचा दृष्टीकोन बदलत नाही. एखाद्याला एखादा विषय अवघड जात असेल तर क्लासला गेले तर हरकत नाही, परंतू, सर्रासपणे ‘कोचिंग सेंटर’ला गेलेच पाहिजे, असे नाही. आपल्या पाल्याच्या अभ्यासाबाबत पालकांनीही नेहमी संपर्कात असने ही त्यांचीही जबाबदारी आहे. नवीन शैक्षणिक धोरणास अनुसरुन केंद्र शासनाने शालेय स्तरावर ‘कोचिंग सेंटर’बंद करण्याचा निर्णय घेतला असे तर तो योग्यच आहे.
कोणत्याही क्षेत्रात शंभर टक्के चुक किंवा शंभर टक्के बरोबर, असे कधीत नसते. प्रत्येक क्षेत्रात चांगल्या गोष्टी असतात तशा काही उणिवाही असतात. परंतू, एखाद-दुस-या उणिवाच उगाळत बसणे योग्य नाही. आम्ही आमच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी जे जे शक्य आहे ते सर्व करतो. रेग्युलर क्लास असतातच परंतू, एक्स्ट्रा क्लाासही घेतो. परीक्षेसाठी आवश्यक असणारी सर्व तयारी शाळेत करुन घेतो. शाळा सुटल्यानंतर मुलगा घरी जातो आणि अभ्यासालाच बसत नाही म्हणून त्याला ‘कोचिंग सेंटर’चा पर्याय देणे कितपत योग्य आहे, याचा विचार पालकांनीच करावा, असे लातूर शहरातील दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुणवत्ताधारक विद्यार्थी असणा-या एका नामवंत शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या.
शालेय स्तरावर ‘कोचिंग सेंटर’ बंदच झाले पाहिजेत. कारण शाळेतील शिक्षक खुप मेहनतीने विद्यार्थी घडवतात. तो विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी दहावीच्या परीक्षेत गुणवत्तेत आली की ‘कोचिंग सेंटर’चालकच त्याचे श्रेय घेतात. खरे तर शाळेतील शिक्षकांच्या कष्टाचे व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे ते यश असते. विद्यार्थी शाळेत आल्यापासून ते तो घरी जाईपर्यंतची सर्व जबाबदारी शिक्षकांची असते. विद्यार्थ्यांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच विद्यार्थ्यांची सुरक्षा, आरोग्य याची काळजी शाळेतच घेतली जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे आई-वडीलानंतर विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार शिक्षकच देतात. हे ‘कोचिंग सेंटर’मध्ये घडत नाही, असे मुख्याध्यापक म्हणाले.