31.7 C
Latur
Saturday, May 11, 2024
Homeसंपादकीय विशेषदुग्धक्रांती नव्या वळणावर

दुग्धक्रांती नव्या वळणावर

जागतिक दुग्धोत्पादनात भारताचा वाटा २४ टक्के आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच गेल्या दहा वर्षांत दुग्धोत्पादन व त्यांच्या उत्पादनक्षमतेत सर्वाधिक वाढ झाली आहे. दुधाच्या वाढत्या मागणीमुळे आणि विक्रीमुळे जगभरातील देशांचे लक्ष या व्यवसायावर ताबा मिळविण्याकडे लागले आहे. जगभरात दूध व्यवसाय करणारी आघाडीची आणि मोठी कंपनी फ्रान्सच्या लॅक्टेलने भारतातील सर्वांत मोठी तिरुमला डेअरी (हैदराबाद) ला १७५० कोटी रुपयांत खरेदी केली आहे. तेल कंपनी ऑईल इंडियादेखील या क्षेत्रात प्रवेश करीत आहे. अमेरिकादेखील आपले पनीर भारतात विकण्यास इच्छुक आहे.

शुपालन आणि दुग्धोत्पादन मंत्रालयाने देशात दुग्धोत्पादन आणि वाढत्या मागणीबाबत उत्साहवर्धक अहवाल सादर केला आहे. दुग्धोत्पादनात भारत हा पूर्वीपासूनच जगात पहिल्या स्थानावर आहे. जागतिक दुग्धोत्पादनात भारताचा वाटा २४ टक्के आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच गेल्या दहा वर्षांत दुग्धोत्पादन व त्यांच्या उत्पादनक्षमतेत सर्वाधिक वाढ झाली आहे. दुधाची उपलब्धता वाढण्याबराबेरच भारतीयांच्या आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचे प्रमाणही वाढले आहे. सद्यस्थितीत प्रत्येक भारतीय नागरिक दररोज सरासरी ६५ ग्रॅमपेक्षा अधिक दुधाचे सेवन करत आहे. जागतिक सरासरी ३९४ ग्रॅम आहे.

ब्रिटिश राजवटीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली धवल म्हणजे दुग्धक्रांतीचा जन्म झाला होता. गुजरातच्या कैरा भागात धवल क्रांतीची बिजे रोवली गेली आणि स्वातंत्र्यानंतर तो भाग खेडा जिल्हा म्हणून नावारुपास आला. आता त्यास आणंद नावाने ओळखले जाते. ब्रिटीशांच्या काळात पॉल्सन नावाच्या ब्रिटिश कंपनीची या क्षेत्रातील दूध खरेदीवर एकाधिकारशाही होती. कंपनीकडून दुग्ध उत्पादक शेतक-यांचे शोषण केले जात होते. यासंदर्भातील तक्रार शेतक-यांनी सरदार पटेलांकडे केली. पटेल हे गोधन, गायीचे दूध आणि गोदान या हिंदू जीवनशैलीचे पाईक होते. त्यांनी शेतक-यांना कंपनीला दूध विकण्यास मनाई केली. जेव्हा कंपनीला दूध मिळणार नाही, तेव्हा कंपनीला शेतक-यांच्या अटी मान्य कराव्याच लागतील, अशी कणखर भूमिका घेतली. त्यांनी शेतक-यांची सहकारी संस्था स्थापन करून या माध्यमातून शेतक-यांना स्वत दूध आणि दुग्ध उत्पादने विकण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यानंतर १९४६ मध्ये पटेल यांनी मोरारजी देसाई आणि त्रिभुवन दास पटेल यांच्या सहकार्याने भारतात पहिली दूध सहकारी संस्था स्थापन केली. त्यानंतर ती जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणून ओळखली जावू लागली.

प्रारंभीच्या काळात दररोज २५० लीटर दुधाचे उत्पादन करणारी ही संस्था आज जगात ‘अमूल’ नावाने ओळखली जाते. मिशिगन स्टेट विद्यापीठात मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन भारतात परतलेले वर्गीस कुरियन यांनी सरकारी नोकरी सोडून या संस्थेचे काम सुरू केले आणि भारताचा पहिला दूध पुनप्रर्क्रिया केंद्र स्थापन केला. त्यानंतर शेतक-यांची मेहनत आणि कुरियन यांचे यांत्रिक योगदान यामुळे या संस्थेने यशाचे शिखर गाठले. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय देशातील दूध व्यवसाय हा ७० टक्के असंघटित क्षेत्राकडून होतो. उर्वरित ३० टक्के व्यवसाय हा संघटित क्षेत्राकडे गेला आहे. म्हणजे डेअरीच्या माध्यमातून होतो. देशात दूध उत्पादनात ९६ हजार सहकारी संस्था सामील असून १४ राज्यांकडे स्वत:चे दूध सहकारी संस्था आहेत.

दुग्धोत्पादनात आठ कोटींपेक्षा अधिक नागरिकांना रोजगार मिळाला असून हेच त्याचे मोठे वैशिष्ट्ये आहे. दररोज पाच लाखांहून अधिक गावांतून दूध संकलन करून ते दूध डेअरीत पोचवले जाते. व्यापक प्रमाणात ग्रामस्थ हे थेटपणे शहर किंवा महानगरातील ग्राहकांना दुधाची विक्री करतात. २०१३-१४ या काळात देशात १४६३ लाख टन दुग्धोत्पादन झाले आणि ते २०२२-२३ या काळात विक्रमीरित्या वाढत २३०६ लाख टनावर पोचले. स्वातंत्र्यानंतरची उत्पादनातील ही सर्वाधिक वाढ आहे. भारतात दुग्धोत्पादन वार्षिक ५.९ टक्क्यांपेक्षा अधिक दराने वाढत आहे. जगभरात दुग्धोत्पादन वाढीचे वार्षिक प्रमाण केवळ २ टक्के आहे.

सुमारे दीडशे देशांत भारतीय दुग्धजन्य पदार्थांना मागणी आहे. गेल्यावर्षी ६५ लाख टन दुग्धजन्य पदार्थांची निर्यात झाली. केंद्रीय पशुपालन आणि दुग्धव्यवसाय खात्याचे राज्यमंत्री संजीव बालियान म्हणतात, देशाच्या अर्थव्यवस्थेत डेअरी सेक्टरचे योगदान पाच टक्के आहे आणि सुमारे आठ कोटी नागरिकांसाठी बारामाही उत्पन्नाचे साधन आहे. दुधाच्या अर्थव्यवस्थेत समृद्ध येण्याचा मार्ग राष्ट्रीय गोकुळ मिशन आस्तित्वात आल्यानंतर खुला झाला. त्याची सुरुवात डिसेंबर २०१४ मध्ये झाली. त्याचे ध्येय शास्त्रीय मार्गाने देशी गायींच्या प्रजातींचा विकास आणि संवर्धन करणे. अर्थात त्याचे परिणाम उपयुक्त ठरले. यापूर्वी देखील देशात दूध उत्पादन वाढविण्याया दृष्टीने वर्ण संकर पद्धतीवर (हायब्रिड सिस्टिम) भर दिला गेला. त्यामुळे वाढ तर नोंदली गेली, मात्र त्याचा वेग संथ होता. आता गोवंश वृद्धीसाठी नवीन शास्त्रीय उपाय अंगीकारले गेले आहेत.

दुधाच्या वाढत्या मागणीमुळे आणि विक्रीमुळे जगभरातील देशांचे लक्ष या व्यवसायावर ताबा मिळवण्याचे लागले आहे. जगभरात दूध व्यवसाय करणारी आघाडीची आणि मोठी कंपनी फ्रान्सच्या लॅक्टेलने भारतातील सर्वात मोठी तिरुमला डेअरी (हैदराबाद) ला १७५० कोटी रुपयांत खरेदी केले आहे. तेल कंपनी ऑइल इंडिया देखील या क्षेत्रात प्रवेश करत आहे. अमेरिका देखील आपले पनीर भारतात विकण्यास इच्छुक आहे. तथापि, त्याच्या निर्मिती प्रक्रियेत बछड्याच्या आतड्यापासूनचा एका पदार्थाचा वापर केला जातो. त्यामुळे शाकाहारी मंडळींसाठी हे पनीर वर्ज्य ठरणार आहे.

-नवनाथ वारे, कृषि अभ्यासक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR