22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रघोळात घोळ!

घोळात घोळ!

मतदार याद्यांतून लाखो नावे गायब? मतदार संतापले पाचव्या टप्प्यातही नागरिक मतदानापासून वंचित

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासून अनेक ठिकाणी मतदार यादीतून नावे गायब झाल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. आज अखेरच्या टप्प्यात तर एकट्या मुंबईसह उपनगरांत मतदार याद्यांतील घोळामुळे लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिले. त्यामुळे मतदारांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पालघरमधील नालासोपारा, बोईसर येथे जवळपास दीड लाख, एकट्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात १ लाखावर मतदार मतदानापासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला. यासोबतच कल्याणमध्येही जवळपास ८० हजार मतदार वंचित राहिल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, बोगस मतदानावरूनही आरोप-प्रत्यारोप झाले.

लोकसभा निवडणूक सुरू झाल्यापासून महाराष्ट्रात प्रत्येक टप्प्यात मतदार यादीतील घोळामुळे अनेकांना मतदार यादीत उभे राहून मतदानाविना परतण्याची वेळ मतदारांवर आली. मुंबईत तर लाखो मतदार यादीत नावे नसल्याने मतदान करू शकले नाहीत. मुंबईत ब-याच भागात याची प्रचिती आली. भिवंडी, कल्याणसोबतच नालासोपारा, बोईसर मतदारसंघातूनही तब्बल दीड लाख लोकांची नावे वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. एकट्या नालासोपा-यातून १ लाख ९ हजार आणि बोईसरमधून जवळपास ५५ लाख मतदारांची नावे गायब झाल्याचे समोर आले. हा भाग पालघर लोकसभा मतदारसंघात येतो. ही नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. याला निवडणूक प्रशासनाचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून, यामुळे लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे मतदारांमधूनही तीव्र संताप व्यक्त होत आहे.

राज्यात आज १३ जागांसाठी मतदान पार पडले. त्यामुळे मुंबईसह राज्यात इतर ठिकाणी मतदारांनी मतदान करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होताना त्यांच्या मनात उत्साह होता. परंतु मतदान केंद्रावर यादीत नाव पाहिले, तर अनेकांची नावे गायब असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मतदान केंद्रांवर एकच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक मतदारांनी मतदारयाद्या स्वत:च्या डोळ््याने चाळून पाहिल्या. परंतु प्रत्यक्षात नावच गायब झाल्याचे दिसून आल्याने नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली. कल्याण पश्चिमेकडील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली. परंतु अनेकांची नावे न सापडल्याने तीव्र संताप व्यक्त केला. तसेच निवडणूक आयोगाचाही निषेध केला.

मतदारांचा हिरमोड
मतदान केंद्रावर जाऊन लाखो मतदारांचा हिरमोड झाला. त्यांनी मतदार यादीतील नावे चाळून पाहिली. परंतु कुठेही नाव सापडले नसल्याने ब-याच मतदारांना मतदान न करताच परतावे लागले. त्यामुळे मतदारांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बोगस मतदानावरून आरोप
भिवंडीत बोगस मतदान होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. भिवंडीचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी या केंद्राला भेट दिली. त्यावेळी कपिल पाटील यांनी निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना फैलावर घेतले. दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनीही बोगस मतदानाचा आरोप केला.

ठाकरे-फडणवीसांमध्ये जुंपली
जिथे शिवसेनेची ताकद आहे, अशा भागात निवडणूक आयोगाचे अधिकारी जाणीवपूर्वक दफ्तरदिरंगाई करत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे सुरू केले आहे, असे सांगत उलट तुम्हीच अधिका-यांना धमक्या देत आहा, असा पलटवार केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR