जबलपूर : वृत्तसंस्था
मध्य प्रदेशातील जबलपूर येथील सरकारी राणी दुर्गावती रुग्णालयात एका महिलेने चक्क ५ किलो २ ग्रॅम वजनाच्या एका विशाल बाळाला जन्म दिला. डॉक्टरांनी सांगितले की, अशा जास्त वजनाच्या बाळांचा जन्म दुर्मिळ असतो. सध्या आई आणि बाळ दोघेही डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
जबलपूरमधील रांझी परिसरातील रहिवासी असलेल्या शुभांगी चौकसे यांनी बुधवारी एका निरोगी बाळाला जन्म दिला. युनिटच्या प्रमुख स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भावना मिश्रा यांनी सांगितले की, इतक्या जास्त वजनाचे बाळ त्यांनी अनेक वर्षांत पाहिले नाही. सहसा, अशा बाळांना २४ तास निरीक्षणाखाली ठेवले जाते, कारण त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी चढ-उतार होण्याची शक्यता असते. साधारणपणे, जन्माला येणा-या बाळाचे वजन २.८ ते ३.२ किलो असते, परंतु गर्भवती महिलांची चांगली काळजी घेतली जात असल्याने जन्माला येणा-या बाळाच्या वजनात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.