चाकूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत निवडणुका जाहीर होताच तालुक्यातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. प्रत्येक गटातून व गणातून इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे. इच्छुकांकडून संघटन बांधणी, जनसंपर्क मोहिमा, बैठका व गाठीभेटींचा जोर वाढला असून तालुक्यात निवडणूक रणधुमाळीस सुरुवात झाली आहे. तालुक्यातील नळेगाव जिल्हा परिषद गट खुला प्रवर्ग असल्याने येथे निवडणूक अत्यंत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसकडून काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष, माजी प.स.सदस्य अनिल चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा असून, त्यांनी प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क वाढविला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे यांचे नाव आघाडीवर असून, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे तर भाजपाकडून अमर पाटील, चंद्रशेखर तांदळे, अॅड. दत्तात्रय राजमाने हे इच्छुक उमेदवार आहेत. चापोली गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी आरक्षित असल्याने येथे महिला उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे निकटवर्तीय व चापोलीचे सरपंच भालचंद्र चाटे यांच्या पत्नी रंजना भालचंद्र चाटे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे वृत्त आहे.
भाजपाकडून सुमन लोणाळे, मीना हाके यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. काँग्रेसकडून विमल चाटे यांचे नाव पुढे येत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून किरण गोरगिळे या चर्चेत आहेत. रोहिणा गट अनुसूचित जमाती (महिला) साठी राखीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून माजी नगराध्यक्ष उषा कांबळे तसेच माजी पं.स.सदस्या अर्चना तिकटे यांच्या नावांची चर्चा आहे. भाजपाकडून माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या कन्या सुप्रिया शृंगारे, धनश्री अर्जुने, रेखा माने यांची नावे चर्चेत आहेत. जानवळ गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असून, काँग्रेसकडून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक एन.आर.पाटील यांची उमेदवारी निश्चीत मानली जात आहे. तसेच काँग्रेसकडून चंद्रकांत मद्दे यांचेही नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे विश्वासू सहकारी दयानंद सुरवसे यांची उमेदवारी जवळपास निश्चीत मानली जात आहे.
भाजपाकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या नावाची जोरदार चर्चा असून पंचायत समितीचे माजी सभापती व बाजार समितीचे विद्यमान संचालक व्यंकटराव सोनवणे, अॅड.निवृत्ती कराड, दिलीप राख, विनायक साबदे, रमाकांत साबदे, शंकर चाटे यांची नावे चर्चेत आहेत. वडवळ नागनाथ गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून घरणीचे माजी सरपंच भानुदास पोटे, भाजपाकडून घारोळ्याचे सरपंच अशोक चिंते यांची नावे चर्चेत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे तालुकाध्यक्ष शिवाजी बैनगिरे यांचेहीे नावही पुढे येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी असून एकूणच चाकूर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. चार दिवसांत सर्वच पक्षाची उमेदवारी निश्चित होताच निवडणूक रणधुमाळीस सुरुवात होणार आहे.

