23.7 C
Latur
Tuesday, July 1, 2025
Homeलातूरचाकू हल्ल्यानंतर अर्धा तास विव्हळत होते दोघे बंधू

चाकू हल्ल्यानंतर अर्धा तास विव्हळत होते दोघे बंधू

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील रावणकोळा येथे दि. १३ जानेवारी रोजी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान महेश उत्तम सूर्यवंशी व विकास शिवाजी सूर्यवंशी या दोन भावंडावर गावातीलच आरोपींनी चाकूहल्ला केला. एकाच्या छातीमध्ये चाकूचा वार करण्यात आला नंतर त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून गंभीर जखमी करण्यात आले तर दुस-याच्या पोटामध्ये चाकूचा वार करण्यात आला. चाकू हल्ला झाल्यानंतर हे दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले होते . मदतीसाठी ओरडत होते परंतु मदतीसाठी अर्धा तास कोणीही जवळ आले नाही. संबंधित मुलांची आई आली. आईने आरडाओरडा केला. त्यानंतर गावातील काही तरुण मंडळी पुढे आली. यानंतर या घटनेची पोलिसांना कल्पना देण्यात आली. पोलिसांनी रुग्णालयात आणण्याच्या सूचना दिल्या. यानंतर जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही भावावर रावणकोळा येथे एकाच चितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयत महेश सूर्यवंशी व विकास सूर्यवंशी हे दोघेही दुचाकीवर रात्री उशिरा जळकोट येथून आपल्या मूळ गावी रावणकोळा येथे गेले. रात्री गावाकडे गेल्यानंतर एका दुकानांमध्ये थांबले , यानंतर गावातील सार्वजनिक विहिरीजवळून घराकडे जात होते . वाटेत आरोपी हे दबा धरून बसले होते. काही कळण्याच्या आतच भाऊसाहेब पाटील यांच्या जुन्या घरासमोर एकाने चाकूने दुचाकीवरील समोरच्या मुलावर हल्ला केला .यात तो गंभीर झाल्यामुळे खाली पडला. यानंतर मागचा मुलगा जो होता तो तलावाकडे पळाला. तलावाच्या पाळू वर गेल्यानंतर त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. गावातील नागरिकांना काही कळण्याच्या आतच हा प्रकार घडला. हल्ला झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये नागरिक त्या ठिकाणी पोहोचले मात्र मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही.

हल्ला केल्यानंतर आरोपींनी तेथून पोबारा केला. जळकोट पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला यातील मुख्य आरोपी फरार आहे. मयत महेशची आई वैजयंतीमाला उत्तम सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश मुरहारी सूर्यवंशी, अमित माधव गायकवाड, सुदर्शन दयानंद सूर्यवंशी, शैलजा यादव सूर्यवंशी, सतीश सुखराज वाघमारे सर्व रा रावणकोळा यांच्याविरुद्ध कलम ३०२, १४३, १४७ ,१४८, १४९, ३४ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR