सोलापूर-
चार हुतात्मा स्मारक आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसराचे स्मार्ट सिटी योजनेतून अलीकडेच सुशोभीकरण करण्यात आले. परंतु, अवघ्या दोन महिन्यातच कारंजाला असलेली फरशी तुटून पडल्याने निकृष्ट कामाचा नमुना समोर आला आहे. त्याठिकाणी शिवसेनेने रांगोळी काढून व फुले वाहून अनोख्या पध्दतीने त्या कामाचा निषेध नोंदविला.
सुशोभीकरण केलेल्या कारंजाच्या शेजारी असलेली जाळी गंजून निकामी झाली आहे. यावरून कामाचा दर्जा लक्षात येतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरात विविध घाट, विहिरी पाणपोईबरोबरच धर्मशाळा बांधल्या. त्या आज देखील सुस्थितीत आहेत. चार हुतात्म्यांनी स्वातंत्र्यलढ्यात आपले बलिदान देऊन सोलापूरचा गौरव वाढवला आहे. ज्या स्वातंत्र्यवीरांनी, हुतात्म्यांनी स्वातंत्र्याची स्वप्ने पाहिली, सुशासनाची अपेक्षा केली. त्यांच्या स्मारकाच्या ठिकाणी ज्या पध्दतीने खाबुगिरी होऊन निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले.
त्याचा निषेध शिवसेनेच्यावतीने करण्यात आला. याप्रसंगी शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी महापालिकेच्या बेजबाबदार कारभाराचा निषेध केला.स्वातंत्र्यवीरांचा महापालिकेने अपमान केला असून याचा जाब जनता विचारेल व निवडणुकीत याची प्रचिती येईल असा इशारा दिला. उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी अधिकारी आपले खिसे भरण्यात व्यस्त असून ते जर कर मागण्यासाठी आले तर जनतेने त्यांना जाब विचारावा असे आवाहन केले. याप्रसंगी संदीप बेळमकर, संताजी भोळे, उज्ज्वल दीक्षित, विजय झवेरी, अरुण लोणारी उपस्थित होते.