बिजींग : वृत्तसंस्था
चीनने तैवानच्या आसपास लष्करी अभ्यास सुरू केला आहे. तैवानकडून बेटाचे प्रमुख भाग ताब्यात घेऊन नाकेबंदी करण्याचा सराव चीनद्वारे केला जात आहे. सैन्य, नौदल, हवाई दल आणि रॉकेट फोर्स हा सराव करत आहे. या सरावात लाईव्ह फायरिंग देखील केली जात आहे.
अमेरिकेने तैवानला शस्त्रे विकण्याची घोषणा केली, त्यानंतर चीनने या सरावाला सुरूवात केली आहे. अमेरिकेच्या या घोषणेवर टीका करताना चीनने अमेरिकन संरक्षण कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. गेल्या काही काळापासून तैवान आपल्या ताफ्यात अनेक शस्त्रे जोडत आहे, त्यामुळे चीनने संताप व्यक्त केला आहे. अशातच आता चीनकडून सरावाला सुरूवात झाल्याने आगामी काळात आता युद्ध पेटण्याची शक्यता आहे.
तैवानने आपल्या सैन्याला हाय अलर्टवर ठेवले आहे. तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की, हा सराव आक्रमक तयारीचा एक भाग आहे. मात्र सध्या चीन शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहे. तैवानच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने चीनच्या या लष्करी सरावावर टीका केली. हा सराव आंतरराष्ट्रीय नियमांना आव्हान असल्याचे म्हटले आहे.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने अशीही माहिती दिली की, आम्हाला तैवानभोवती चिनी विमाने आणि जहाजे आढळली आहेत. त्यामुळे आम्ही सैन्य आणि क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केली आहे.
















