बिजींग : वृत्तसंस्था
जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीन यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. चीनमधून अमेरिकेत जाणा-या जहाजांची संख्या सातत्यानं कमी होतेय. गेल्या १५ दिवसांत हा आकडा फेब्रुवारीनंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. एप्रिलच्या मध्यापासून त्यात ५० टक्क्यांची घसरण झाली. अमेरिकी अर्थमंत्र्यांनी, चीन रेअर अर्थ सारख्याचा पुरवठा थांबवत असल्याचं म्हटलं.
चीननं अमेरिकेसोबत केलेल्या कराराचं पूर्णपणे उल्लंघन केल्याचं यापूर्वी ट्रम्प म्हणाले होते. ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी, चीनला अत्यंत वाईट परिस्थितीपासून वाचवण्यासाठी घाईघाईत करार केला. ‘मिस्टर नाइस गाय’ बनण्याचा हा परिणाम असल्याचंही ते म्हणाले. काही आठवड्यांपूर्वी जिनिव्हा येथे दोन्ही देशांनी एक करार केला होता. याअंतर्गत दोन्ही देशांनी एप्रिलमध्ये एकमेकांवर लादलेलं शुल्क कमी केलं होतं.
ही व्यवस्था ९० दिवसांची होती. पण आता दोन्ही पक्ष एकमेकांवर कराराच्या भावनेच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप करत असल्यानं हा करार तुटण्याच्या मार्गावर आहे. दोन्ही बाजूंमधील चर्चा रखडल्याचं अमेरिकी अधिका-यांचं म्हणणं आहे. वाटाघाटींच्या प्रगतीसाठी ट्रम्प आणि चीनचे नेते शी जिनपिंग यांचा सहभाग आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं. अमेरिकेचा आरोप आहे की, चीननं रेअर अर्थ आणि संबंधित उत्पादनांची निर्यात थांबवली आहे.