संगमनेर : प्रतिनिधी
मागील ४० वर्षांत जनतेला वीज, पाणीप्रश्नाच्या गोष्टी कळाल्या नाहीत. आता संघर्ष करावा लागणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन दबाव ठेवला पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. दरम्यान, सर्व शेतक-यांसमवेत तीन तारखेला वीज अधिका-यांना याबाबत निवेदन देण्यात येणार असून जर आठ दिवसांमध्ये पूर्ण दाबाने, पूर्ण वेळ वीज मिळाली नाही तर मोठे आंदोलन उभारले जाईल,असा इशाराही त्यांनी दिला.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांनी थोरात यांच्यापुढे वीज व पाण्याबाबतच्या समस्या मांडल्या.
यावेळी संतप्त शेतक-यांनी आपल्या भावना मांडताना म्हटले आहे की, मागील तीन महिन्यांपासून प्रवरा नदीकाठी तसेच पठार भागामध्ये विजेचा पूर्ण खेळखंडोबा झाला आहे. पूर्ण दाबाने पूर्ण वेळ वीज मिळाली पाहिजे. मात्र असे न होता अगदी चार तास लाईट मिळत आहे. त्यामुळे शेतक-यांना नदीचे पाणी उचलता येत नाही. पाणी पूर्वेला नेले जात असल्याची संतप्त व्यथा तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी माजी मंत्री थोरात यांच्यापुढे मांडली.