मुंबई : प्रतिनिधी
बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांनी घ्यावा तसेच इतर मागण्यांसाठी आज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. या भेटीपूर्वी संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचा बॉस धनंजय मुंडे आहे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ते राजीनामा का द्यावा म्हणत आहेत. पण आत गेलेले हे लोक कोणाचे आहेत? वाल्मिक कराड हा कोणाचा माणूस आहे? तुमचा संबंध नाही, मग एकदा राजीनामा देऊन तर बघा, होऊन जाऊ द्या फेअर ट्रायल.
हे सरकार धनंजय मुंडे यांना का संरक्षण देत आहे? अजित पवार का संरक्षण देत आहेत? आम्ही हे राज्यपाल महोदयांसमोर मांडणार आहोत, अशी टीका माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, जे गुन्हे लावलेत, त्यातून ते सहज बाहेर पडू शकतात. वाल्मिक कराडलासुद्धा खंडणीच्या आरोपात आत घेतले आहे. या केसशी कनेक्टेड असल्यामुळे त्या पद्धतीने गुन्हे नोंद केले पाहिजेत. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. पंकजा मुंडे बोलल्या आहेत. वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचे पानही हलत नाही. मग, आज गप्प का? असा प्रश्न उपस्थित करत हा एकट्याचा विषय नाही. महाराष्ट्राचा विषय आहे. महाराष्ट्राला हे परवडणार आहे का? असेही संभाजी राजेंनी म्हटले आहे.