20.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeसंपादकीय विशेषछोट्या पक्षांकडे लक्ष

छोट्या पक्षांकडे लक्ष

सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचा ज्वर हळूहळू वाढत चालल्याचे दिसू लागले आहे. भाजपाची घोडदौड पाहता या निवडणुकीत लहान पक्ष काय करणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. विशेषत: देशातील सर्वांत मोठे राज्य असणा-या उत्तर प्रदेशात राष्ट्रीय पक्ष बहुतांश लहान पक्षांशी आघाडी करण्यास उत्सुक असतात. मात्र सतत भूमिका बदलण्याचा या पक्षांचा स्वभाव त्यांना त्रासदायक ठरतो. २०२४ ची लोकसभा निवडणूक आपल्याशिवाय जिंकू शकत नाही, असा त्यांचा दावा आहे. या निवडणुकीत त्यांचा कितपत परिणाम होणार आणि शेवटी ते कोणासमवेत उभे राहतील, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

त्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाचा प्रभाव वाढल्यानंतर अनेक नेत्यांना जात समुदायावर आधारित एखाद्या गटाच्या ऐक्यावर नशीब बदलू शकते, असे वाटू लागले. ओमप्रकाश राजभर यांनी राजभर समुदायात ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि संजय निषादने निषाद समुदायाला. डॉ. अयुब यांनी मुस्लिम वर्गाचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न केला आणि महान दलाचे केशव देव मौर्य यांनी मौर्य, काश्यप आदीसह अन्य अति मागास जातींना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. असे अनेक प्रयत्न झाले. यात काही यशस्वी झाले आणि कालांतराने ते बड्या राजकीय पक्षात विलीन झाले.

विशेष म्हणजे या पक्षाच्या नेत्यांचा प्रभाव हा दोन-तीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित असतो. मात्र ते मोठ्या पक्षांना आपल्या प्रभावाखाली ठेवण्यात यशस्वी होतात आणि कोणत्याही स्थितीत आपली उपेक्षा होणार नाही, याबाबत सजग असतात. तसे धाडसही मोठे पक्ष करत नाहीत. प्रत्येक राजकीय पक्षांनी या लहानसहान पक्षांशी निवडणूक आघाडी केली. मात्र त्यापैकी अनेक आघाड्या या लाभापोटीच झाल्या आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत ते कोणाच्या बाजूने उभे असतील, हे सांगणे कठीण. अर्थात या सर्व गोष्टी माहीत असूनही मोठे पक्ष त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी तयार असतात. पुढे ते कोणासमवेत असतील, याचा त्यांना थांगपत्ताही नसतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हे पक्ष कोणासमवेत आहेत हे आता कळू लागले आहे. बहुतांश पक्ष भाजपसमवेत जाण्यास तयार आहेत. पण एखादा जिंकत असेल तर तो आपल्यामुळेच असा त्यांचा अविर्भाव असतो आणि तो सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारा असतो. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत बहुतांश लहान पक्ष समाजवादी पक्षाकडे गेले आणि तरीही समाजवादी पक्षाचा पराभव झाला. त्यानंतर सर्वांनी आपला मुक्काम हलविण्यासाठी नवीन जागा शोधण्यास सुरुवात केली.

सुहेलदेव भारतीय समाज पक्ष : सध्या लहान पक्षांचे पाठबळ मिळवण्यात भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. सुहेलदेव भारतीय समाज पक्ष हा विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षासमवेत होता. पूर्वी ओमप्रकाश राजभर हे दिवसभरात अनेकदा योगी आदित्यनाथ यांना पराभूत करण्याची भाषा करत असत. आता वेळ बदलली. मोदी यांना जिंकून देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. त्यांच्या मते, राजभर पक्षामुळे एनडीएला दमदार आघाडी मिळेल आणि यासाठी ओमप्रकाश राजभर यांनी भाजपकडून अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याची तयारी केली आहे. मात्र भाजप आताच त्यांच्या मागण्यांवर निर्णय घेणार नाही. सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचा प्रभाव राजभर समुदायाच्या मतदारांवर आहे आणि पूर्व उत्तर प्रदेशातील अर्धा डझन जिल्ह्यांत राजभर समुदायाचे एकगठ्ठा मतदान आहे.

राजभर हे याच मतदारांच्या जिवावर राजकीय पक्षांना खेळवत आहेत. २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत राजभर भाजपच्या बाजूने होते. त्यावेळी त्यांनी आपल्या पाठिंब्यामुळेच भाजप सत्तेवर आल्याचा दावाही केला. ते योगी सरकारमध्ये मंत्री देखील झाले. मात्र आदित्यनाथ यांनी त्यांचा प्रभाव कमी केला असता त्यांनी भाजप आणि योगी यांच्याविरुद्ध बंड पुकारले. बंडखोरी केलेली असतानाही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळाले. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सुहेलदेव भारतीय समाज पक्ष हा समाजवादी पक्षासमवेत उभा राहिला. आता ओमप्रकाश राजभर हे भाजपसमवेत आहेत आणि अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला जात आहे. ते उत्तर प्रदेशात भाजपला प्रचंड बहुमत मिळवून देण्याच्या तयारीत आहेत.

निषाद पक्ष : उत्तर प्रदेशातील पक्ष निषाद पार्टीचे अध्यक्ष संजय निषाद आहेत. राजकारणात अनेक प्रयोग केल्यानंतर ते आता उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आहेत आणि मुलगा खासदार आहे. त्यांना लोकसभेसाठी किमान २४ जागा हव्या आहेत. कारण निषाद समुदाय मोठा आहे आणि निषाद समुदायाचे ते एकमेव नेते आहेत. निषाद समुदाय हा त्यांच्या इशा-यावर चालतो, याची जाणीव संजय निषाद वारंवार करून देतात. प्रत्यक्षात गंगा आणि यमुना नदीच्या काठावर असलेल्या नागरी वसाहतीत निषाद समुदायाची संख्या अधिक आहे. संजय निषाद यांच्याशी कधीही बोला, ते आपल्यामुळे आतापर्यंत कितीजण निवडून आले याची यादी सांगत राहतील. काही वर्षाअगोदर संजय निषाद हे होमिओपॅथी डॉक्टर होते. एक दिवस निषाद यांनी अनुसूचित जातीत समावेश करण्यावरून रेल्वे रोको आंदोलन केले आणि तुरुंगात गेले. तुरुंगातून बाहेर आले ते नेते बनूनच. पुढे ते डॉक्टरऐवजी नेते म्हणूनच ओळखले गेले.

त्यानंतर संजय निषाद यांनी ‘पीस पार्टी’शी आघाडी केली. पीस पक्ष हा स्वत:ला मुस्लिम समुदायाचे तारणहार समजतो. संजय निषाद यांनी ७२ जागांवर निवडणूक लढविली. मात्र केवळ एकच जागा पदरात पडली. त्यामुळे पीस पार्टीत फारसा दम नाही, हे संजय निषाद यांना कळून चुकले. त्यापासून चार हात लांब राहत २०१८ मध्ये तीन लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाशी आघाडी केली. गोरखपूर येथे त्यांनी मुलगा प्रवीणकुमार निषादला समाजवादी पक्षाकडून उभे केले आणि प्रवीण विजयी देखील झाले. या विजयाने संजय निषाद यांची राजकीय शक्ती वाढली. त्यानंतर त्यांनी स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. मात्र तेथे काही डाळ शिजली नाही आणि ते भाजपकडे गेले. त्यांना विधान परिषदेवर पाठविण्यात आले. त्यांचा मुलगा प्रवीणकुमार निषाद हे संत कबीर नगरचे भाजपचे खासदार आहेत. दुसरा मुलगा भाजपचा आमदार. ते स्वत: विधान परिषदेचे सदस्य आहेत. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधानपदावर विराजमान होतील, असा ते दावा करत आहेत. त्यामुळे त्यांना सर्व जागा हव्या आहेत. मात्र भाजप त्यांना अधिक जागा देण्यास तयार नाही.

पीस पार्टी : उत्तर प्रदेशातील आणखी एक पार्टी पीस पार्टी. त्याचे संस्थापक डॉक्टर अयुब असून ते सर्जन आहेत. २००८ मध्ये त्यांनी पक्षाची स्थापना केली आणि त्याचे नाव पीस पार्टी असे ठेवले. २०१२ मध्ये पीस पार्टीने चार जागा जिंकल्या आणि त्यांची प्रतिष्ठा वाढली. २०१४ मध्ये डॉ. अयुब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘दहशतवादी’ म्हणून संबोधले. पण त्यांना बदलत्या हवेचा अंदाज येऊ लागला. आता ते एनडीएमध्ये जाण्यासाठी धडपड करत असून ते आपल्याला सोबत घेतील, अशी त्यांची अपेक्षा आहे. भाजपपासून फार दूर राहू नका, असे ते मुस्लिम समुदायाला सांगत असतात. ते मुस्लिमांचे शत्रू नाहीत, असेही म्हणतात. पीस पार्टीने अनेक पक्षांशी आघाडी केली आहे. २०२४ च्या निवडणुकीत काय होईल, हे आताच सांगता येणार नाही.

महान दल : महान दल पक्षाचे नेते केशव मौर्य देव हे राज्यातील अतिमागास समुदाय हा आपल्यासमवेत असल्याचा दावा करतात. २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीत केशव दल मौर्य हे अखिलेश यादव यांच्यासमवेत होते आणि त्यांच्यासाठी प्रचार देखील केला. अखिलेश यादव यांची लाट आल्याचे त्यांनी जाहीरही केले. प्रचारासाठी अखिलेश यादव यांनी त्यांना एक गाडी देखील दिली. मात्र निवडणुकीत समाजवादी पक्षाचा पराभव झाला. त्यानंतर महान दलाचे नेते केशव देव मौर्य यांनी ‘यू टर्न’ घेतला आणि समाजवादी पक्षाशी नाते तोडले. नाराज अखिलेश यादव यांनी त्यांची गाडी काढून घेतली. त्यामुळे केशव देव मौर्य देखील खूप नाराज झाले.

अपना दल : अपना दल हा गेल्या दहा वर्षांपासून भाजपसमवेत आहे आणि उत्तर प्रदेश आणि दिल्लीत सत्तेत भागीदार देखील आहे. अध्यक्ष अनुप्रिया पटेल या सोनेलाल पटेल यांच्या कन्या. सोनेलाल पटेल हे कधीकाळी बसपमध्ये सक्रिय होते. मात्र मायावती यांनी त्यांची हकालपट्टी केली असता त्यांनी अपना दलची स्थापना केली आणि कुर्मी समुदायाला एकत्र केले. २००९ मध्ये रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर पक्षाचे नेतृत्व अनुप्रिया पटेल यांनी स्वीकारले. मात्र अनुप्रिया पटेल यांच्याविरुद्ध बंडखोरी झाली आणि पक्षात फूट पडली. एका गटाच्या नेत्या अनुप्रिया पटेल तर दुस-या अपना दलच्या (कमेरावादी) नेत्या त्यांची आई कृष्णा पटेल आणि त्यांची कन्या व अनुप्रिया पटेल यांची बहीण पल्लवी पटेल. पल्लवी पटेल यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा पराभव केला. आता अनुप्रिया पटेल नरेंद्र मोदी सरकारमध्ये तर पती उत्तर प्रदेशातील योगी सरकारमध्ये मंत्री. असे अनेक राजकीय पक्ष काळानुसार मोठ्या पक्षांसमवेत गेले. अर्थात उत्तर प्रदेशच्या राजकारणात लहान पक्षांचा ‘जलवा’ कायमच आहे. मात्र ते आपली राजकीय शक्ती नेहमीच फुगवून सांगतात.

– अमित शुक्ल

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR