सिद्धार्थ उद्यानात दुर्घटना, ५ जण जखमी, वादळी वा-यासह पाऊस
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेच्या प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानात भिंत कोसळून २ महिलांचा मृत्यू झाला. या दोन्ही महिला पर्यटक होत्या. यामध्ये इतर ५ जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार स्वाती खैरनार (३५, हल्ली मुक्काम रांजणगाव, मूळगाव लासलगाव), रेखा गायकवाड (६५, गजानननगर) असे मयत झालेल्या महिलांची नावे आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जोरदार वादळ आले. पाऊसही झाला. या पावसामुळे उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीचा काही भाग कोसळला आणि या घटनेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर इतर ५ जण जखमी झाले. या दुर्घटनेत मृत पावलेल्या महिला स्वाती अमोल खैरनार चाळीसगावच्या धामणगाव येथील रहिवासी होत्या. त्या रांजणगाव शेणपुंजी येथे वास्तव्यास होत्या तर ६५ वर्षीय रेखा हरिभाऊ गायकवाड गजानननगर परिसरात वास्तव्यास होत्या. अखिल शेख आणि आणखी चार लहान मुले किरकोळ जखमी झाली.
या दुर्घटनेत ज्या दोन महिलांचा मृत्यू झाला, त्या उद्यानातील कर्मचारी असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि नागरिकांच्या मदतीने जखमींना घाटी रुग्णालयात हलविले. सिद्धार्थ उद्यानातील भिंत व गेट परिसरातील बांधकाम बीओटी तत्वावर खासगी ठेकेदाराला देण्यात आले होते. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई होऊ शकते.
नातेवाईकांचा हृदय
पिळवटणारा आक्रोश
छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे सिद्धार्थ उद्यानातील प्रवेशद्वारावर असलेला डोम अचानक कोसळला. यामध्ये २ पर्यटकांचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले आहेत. जखमी आणि मृतांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी नातेवाईक मोठ्या संख्येने जमा झाले. याप्रसंगी घाटी परिसरात नातेवाईकांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहायला मिळाला.
सदोष मनुष्यवधाचा
गुन्हा दाखल करणार
सिद्धार्थ उद्यानातील भिंत व गेट परिसरातील बांधकाम बीओटी तत्वावर खासगी ठेकेदाराला देण्यात आले होते. देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराचीच होती. यात ठेकेदाराचा हलगर्जीपणा दिसून येत असून, त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली.