नगर : प्रतिनिधी
संगमनेरमधील हिंसाचार प्रकरण विरोधकांच्याच जास्त अंगलट आले आहे. संगमनेर पोलिस ठाण्यात आंदोलन आणि सभा घेतल्याप्रकरणी विरोधकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात, शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, प्रभावती घोगरे, उत्कर्षा रुपवते, इंद्रजित थोरात, शरयू थोरात यांच्यासह ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या संगमनेरमधील धांदरफळच्या सभेनंतर हिंसाचार उफाळला. या सभेत वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे नेते संगमनेर पोलिस ठाण्यात जमा झाले होते.
विधानसभा निवडणूक सुरू असल्याने आचारसंहिता सुरू आहे. कोणतीही पूर्वपरवानगीशिवाय संगमनेर पोलिस ठाण्यात आंदोलन केले. याशिवाय सुजय विखे आणि वसंतराव देशमुख यांच्या प्रतिमेला असंविधानिक शब्दांचा वापर करत जोडे मारो आंदोलन केले. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. जयश्री थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ. सुधीर तांबे यांच्यासह ५० जणांवर संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.