लातूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या जय शिवाजी, जय भारत पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दयानंद महाविद्यालयाच्या मैदानातून सुरु झालेल्या या पदयात्रेत विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या तालावर विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लेझीम पथक, झांज पथकाने केलेल्या सादरीकरणाने यावेळी उपस्थितांची मने जिंकली. तसेच यावेळी जय भवानी, जय शिवाजी या घोषणेने सर्व परिसर दुमदुमून गेला. आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेला सुरुवात झाली.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, महानगरपालिका उपायुक्त पंजाबराव खानसोळे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, योजना शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
या पदयात्रेत सहभागी झाले होते. यामध्ये अनेक विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, वारकरी आदी पारंपारिक वेशभूषा केल्या होत्या. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात विविध शाळा, महाविद्यालयांच्या लेझीम, झांज पथकांचे सादरीकरण सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. दयानंद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संदीपान जगदाळे यांनी सादर केलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावरील पोवाडा आणि उपस्थितांकडून देण्यात आलेल्या ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या सळसळत्या उत्साहात दयानंद महाविद्यालयाच्या मैदानातून पदयात्रेला सुरुवात झाली. अश्वारुढ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील विद्यार्थी आणि चित्ररथ या पदयात्रेच्या अग्रस्थानी होता.
आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी यांच्यासह सर्व उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. पुन्हा दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर आल्यानंतर पदयात्रेचा समारोप करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत या यात्रेचे संयोजन करण्यात आले. यावेळी आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांची भाषणे झाली. प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी प्रास्ताविकामध्ये जय शिवाजी, जय भारत पदयात्रा आयोजनाचा हेतू विशद केला. सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.