विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, आज जरांगेंना भेटणार
मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाशी संबंधित विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील मैदानात उतरले आहेत. आज त्यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ३० मेपासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यामुळे जरांगे यांच्या मागण्यांबाबत सरकारी पातळीवर हालचाली वेगात सुरू असून, उद्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जरांगे यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
दरम्यान, जरांगे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत आपण सरकारला दहा महिन्यांचा वेळ दिला. २९ मे रोजी १० महिने पूर्ण होत आहेत. सरकारला अजून किती वेळ द्यायचा, असा सवाल त्यांनी केला आहे. मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे आता कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे, असे जरांगे पाटील म्हणाले. त्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वाहनाने मुंबईकडे रवाना झाले. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विखे पाटलांची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर ते उद्या दुपारी बारा वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होणार असून, येथे विखे पाटील यांची विभागीय आयुक्त कार्यालयात अधिका-यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर विखे पाटील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री सकारात्मक
जरांगेंच्या इशा-यानंतर मंत्री विखे पाटील यांनीही पत्रकार परिषद घेतली आणि मी सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहे. या विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय सकारात्मक आहेत, असे म्हटले.
















