जालना – पंकजा मुंडे, महादेव जानकर यांच्या पराभवासाठी मनोज जरांगेंनी कुठे आणि कुणासोबत बैठका घेतल्या? मनोज जरांगे पाटलांनी अभ्यास न करता बोलू नये. सगळ्या जातींना घेऊन मुख्यमंत्री चालतात पण हे मुख्यमंत्री जरांगेंच्या तालावर नाचतात.
जरांगे मनोरुग्ण माणूस आहे. सहा आंदोलनात सहा मागण्या करणारा हा माणूस आहे. मुख्यमंत्री मराठ्यांचं ऐकतात आणि दुस-याचं ऐकत नाहीत. धनगर आणि ओबीसी वेगळे आहेत असं म्हणतो, त्याला माहिती नाही मग मुख्यमंत्र्यांना पण माहिती नाही का? असा सवाल करत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले की, मुख्यमंत्र्यांना धनगरांच्या एसटीबाबत जीआर काढण्याचा अधिकार नाही. हा संसदेचा अधिकार आहे.
राष्ट्रपतींच्या सहीने पत्र जाते, त्यानंतर संसदेत मंजुरी मिळते, त्यानंतर हे आरक्षण मिळेल. या सरकारने जितके जीआर काढले ते बेकायदेशीर, अवैध आहेत. याआधीचे कोर्टाने दिलेले निकालपत्र वाचत नाहीत. कुणी आंदोलन केले तर समिती नेमली जाते. महाराष्ट्राच्या अॅटर्नी जनरलचे मुख्यमंत्री ऐकत नसतील. घटनेशी द्रोह मुख्यमंत्री करतायेत. २ नंबरचे धंदे करणा-यांना आमदार, खासदारकीचे तिकिट देतात ते अठरापगड जातीचे प्रश्न कसे संसदेत मांडतील. एकनाथ शिंदे हे २ नंबर टोळीचे नेतृत्व करतात, एका जातीसाठी ते काम करतात, असा आमचा थेट आरोप आहे असे त्यांनी सांगितले.
तसेच शिक्षण, नोकरीसाठी महाराष्ट्रात धनगरांसाठी वर्गीकरण केलंय, ते व्हीजेएनटीमध्ये. मात्र धनगर हे ओबीसीत आहेत. जरांगेंनी अभ्यास करावा. मराठा समाज मागासलेला आहे हे कुठल्याही आयोगात सिद्ध होत नाही, अशी टीका लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर केली.