नाशिक : प्रतिनिधी
उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीच्या दुस-या टप्प्याचीही सांगता झाली. सोलापूरमधून सुरुवात केलेल्या शांतता रॅलीची छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला मानला जाणा-या नाशिकमध्ये सांगता झाली. नाशिक हा भुजबळांचा नाही तर मराठ्यांचा बालेकिल्ला असल्याचे म्हणत भुजबळांना लक्ष्यही केले होते. दरम्यान, नाशिकच्या जरांगे रॅलीवर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, जरांगेंच्या रॅलीला केवळ ८ हजार लोक होते. आता त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही.
दरम्यान, नाशिकमध्ये मनोज जरांगेंच्या रॅलीला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. विशेष म्हणजे जरांगे पाटील यांनीही नाशिककरांचे आभार मानत, चक्क कॉलर टाईट केल्याचे म्हटले जाते.
नाशिकच्या येवला दौ-यावर आलेल्या मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या सांगता रॅलीला ५ लाख लोक येणार असल्याचा दावा केला. मात्र, प्रत्यक्षात ८ हजार लोक सहभागी झाले होते, असे म्हटले. तर, जरांगेंनी २८८ जागा लढवाव्या आणि मुख्यमंत्री व्हावे, असा उपरोधात्मक टोलाही लगावला. त्यामुळे, आता पुन्हा एकदा जरांगे आणि भुजबळ यांच्यातील वाद वाढणार असल्याचे दिसून येते.
महंतांच्या विधानावर नाराजी
दरम्यान, वादग्रस्त विधान करणा-या महंत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याबद्दल भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रबोधन करताना दुस-या धर्माचा उल्लेख टाळला, कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. कोणाचे मन दुखवू नये. हिंदू, मुस्लिम सर्वांनी शांतता पाळण्याचे आवाहनही यावेळी भुजबळांनी केले.